साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

गिरीश चोडणकर गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, तर राज्यात अपघातांचे सत्र सुरूच

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12 mins ago
साप्ताहिकी - या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : काँग्रेसने गोव्यातील प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदल केला असून, गिरीश चोडणकर यांची नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने गोमेकॉत उपचार घेणारे चिखलीच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे धर्मगुरू तसेच पर्यावरणप्रेमी फादर बोलमॅक्स परेरा यांचे निधन झाले. याशिवाय अपघाती मृत्यू, चोरीच्या घटना घडल्या आहेत. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार 

खंडणी मागितल्या प्रकरणी राजेश दाभोलकरना अटक

गावडेवाडा-मोरजी येथील ‘मे. फेअर रिसॉर्ट’चे न्यायालयात असलेले एक प्रकरण मिटवण्यासाठी व्यवस्थापकाकडे कोट्यवधी रकमेची मागणी करणाऱ्या राजेश दाभोलकरना अटक करण्यात आली आहे. रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने मांद्रे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, संशयिताने रिसॉर्ट परिसरात ड्रोनचा वापर करून मोठ्या प्रमाणात फोटोशूटही केले होते.

बाणावली येथे घराला आग; ३.५ लाखांचे नुकसान

बाणावली येथील वासवाडो परिसरातील एका निवासी घराला रविवारी सकाळी आग लागली. आगीत सुमारे ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत पाण्याचा मारा करत ८ लाख रुपयांची मालमत्ता वाचवली.


उसगाव जंक्शनवर दोन दुचाकींची धडक; तिघे जखमी

उसगाव-तिस्क येथील बगल रस्त्यावरील धोकादायक जंक्शनवर रविवारी सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही दुचाकींवरील एकूण तीन जण जखमी झाले. अपघाताच्या वेळी तिथून कुळेच्या दिशेने जाणारे फोंडाचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांनी तत्परता दाखवत जखमींना स्वतःच्या शासकीय वाहनातून रुग्णालयात दाखल केले.

सोमवार 

बांगलादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर गोव्यात हाय-अलर्ट

संशयास्पद बांगलादेशी नागरिक गोव्यात दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्यांना शोधून ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व रेल्वे स्थानके आणि मुख्य बसस्थानकांवरील सुरक्षा व गस्त मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे.

पत्रादेवी येथे संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर सावंतवाडी येथील पर्यटकांना रविवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद सोमवारी पत्रादेवी सीमाभागात उमटले. संतप्त नागरिक आणि पर्यटकांच्या समर्थकांनी राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडल्यामुळे पत्रादेवी-बांदा-सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास पूर्णपणे ठप्प झाली होती.

बेतीमध्ये दुचाकीची बसला धडक, दुचाकीस्वार ठार

वाळकेश्वरवाडा, बेती येथे मोटारसायकलने प्रवासी बसला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात आकाश जप्रकाश कुमार (२६, रा. मूळ गोरखपूर, उत्तरप्रदेश) हा दुचाकीस्वार ठार झाला. पघातात आकाशचा पाय मोडला. तसेच त्याच्या पोटाला गंभीर जखम झाली.

जेवणाच्या ताटात पाय घातल्याने सहकार्‍याचा खून

ट्रॉलर्सवर काम करणार्‍या कामगारांतील किरकोळ वादाने एकाचा जीव घेतला. जगनंदन सिदार याच्या जेवणाच्या ताटात पाय घातल्याच्या कारणास्तव संशयित संजय मांझी, आशिष कुमार आणि जगनंदन सिदार या तिघांनी शशी लाक्रा याचा खून केला. त्यानंतर मृतदेह नजीकच्या झुडपात टाकून पळ काढला. कोलवा पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केलेली आहे.

मंगळवार 


फादर बोलमॅक्स परेरा यांचे हृदयविकाराने निधन

हृदयविकाराचा झटका आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेणारे चिखलीच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे धर्मगुरू तसेच पर्यावरणप्रेमी फादर बोलमॅक्स परेरा यांचे मंगळवारी (दि. २६) पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रांतील नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणी एकाला अटक

मडगाव येथील एका ४६ वर्षीय नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने मयूर वाघे (वय २५, रा. नालासोपारा, ठाणे) या संशयिताला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

दिकरपाल येथे भंगारअड्ड्याला भीषण आग

सासष्टी तालुक्यातील दिकरपाल येथील दुकळे पोल्युशन सेंटरनजीक असलेल्या भंगारअड्ड्याला मंगळवारी सकाळी आग लागली. मडगाव अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे ही आग पूर्णपणे विझवण्यात आली.

बुधवार 

‘बर्च’ला ईडीचा दणका; ११ कोटींची मालमत्ता जप्त

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यू झालेल्या हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ या आस्थापनावर ईडीने पुन्हा एकदा जप्तीची कारवाई केली आहे. बेकायदेशीर कामकाजाशी संबंधित तपासाच्या अनुषंगाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत ११.०१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता ईडीने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे.


साकोर्डा येथे चिरेवाहू ट्रक कलंडला

साकोर्डा येथील कॅनरा बँकेजवळ बुधवारी दुपारी चिरेवाहू ट्रक कलंडला तर प्रतापनगर - धारबांदोडा येथे सकाळी कारची धडक स्कुटरला बसून झालेल्या अपघातात स्कुटर चालक प्रथमेश हा जखमी झाला. जखमी स्कुटर चालकाला उपचारासाठी मडगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

म्हापसा येथे सौर पॅनेल साफ करताना पडून एकाचा मृत्यू

म्हापसा येथील एका इमारतीवर बसवलेले सौर पॅनेल साफ करत असताना, उंचावरून पडून महाराष्ट्रातील ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

गुरुवार

वेर्णा औद्योगिक वसाहतीतील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त

वेर्णा पोलिसांनी एका बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. हे कॉल सेंटर अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक करण्यात गुंतलेले असल्याचा आरोप आहे. गुरुवारी पहाटे वेर्णा औद्योगिक वसाहतीत टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी याप्रकरणी २६ जणांना अटक केली.

फादर बोलमॅक्स यांना शेवटचा निरोप

गोव्यातील पर्यावरण चळवळीत मोठे योगदान दिलेले फादर बोलमॅक्स परेरा यांना केपेच्या होली क्रॉस चर्चमध्ये शोकाकुल वातावरणात शेवटचा निरोप देण्यात आला.

ड्रग्जप्रकरणी फ्रेंच नागरिकाची निर्दोष सुटका

न्यायालयाने २०१८ मध्ये १९ लाखांचा एलएसडी, कोकेन आणि चरस बाळगल्या प्रकरणातील संशयित स्टीफन हम्बर्ट या फ्रेंच नागरिकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश द्विज्पल पाटकर यांनी दिला.

शुक्रवार


गिरीश चोडणकर गोवा काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच काँग्रेसने गोव्यातील प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदल केला असून, गिरीश चोडणकर यांची नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच एम. के. शेख, आमदार एल्टन डिकोस्टा आणि आमदार अॅड. कार्लुस फेरेरा या तीन नेत्यांवर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


भरधाव जीपची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

फर्नांडिसवाडा-शिवोली येथे भरधाव थार जीपने चुकीच्या दिशेने जाऊन डिओ स्कूटरला दिलेल्या धडकेत संकेत सूर्यकांत दाभोळकर (३४) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातात त्याचा १४ वर्षीय मावस भाऊ गंभीर जखमी झाला असून, मद्यपान करून वाहन चालवल्याच्या आरोपाखाली हणजूण पोलिसांनी संशयित जीप चालकाला अटक केली आहे.

मडगावात पूर्ववैमनस्यातून अल्पवयीनाला मारहाण

मडगाव येथील कदंब बसस्थानकानजीक एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला पाच जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. जुन्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याचे समोर येत असून याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली.

शनिवार

४० वा गोवा घटकराज्य दिन साजरा

गोव्याच्या ४० व्या घटकराज्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय सोहळ्याला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल अशोक गजपती राजू, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह इतर मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.


पणजीतील मळा येथे कारचा स्वयंअपघात; चालक जखमी

मळा, नेवगीनगर-पणजी येथे चारचाकी वाहनाचा स्वयंअपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात वाहनचालक जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) येथे दाखल करण्यात आले.

लक्षवेधी

वार्का येथील व्हिलामध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकाचा आयफोन अज्ञात व्यक्तीकडून चोरण्यात आला. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवला. झारखंड येथील रहिवासी हरीश कुमार चौधरी यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.

बायणा येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या निवासी इमारतीच्या गच्चीवरील सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीची दोन उपकरणे चोरीप्रकरणी प्रणेश मदार (मांगोरहिल) याच्याविरोधात मुरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मानवी तस्करीच्या गुन्ह्यात कागदपत्रे जोडलेली आहेत असे सांगून आणि स्वतःला ईडी व सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली करंजाळे, तिसवाडी येथील एका महिलेला १४ लाखांना लुबाडण्यात आले. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने सखोल तपास करत संशयित आरोपी योगेश कांतीलाल शाह (वय ४५, रा. खंडाळा, महाराष्ट्र) याला अटक केली आहे. 

हेही वाचा