मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा जप्त;अणुऊर्जा प्रकल्प, विमानतळ, रेल्वे स्थानके, वीज निर्मिती प्रकल्प होते लक्ष्य

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचणाऱ्या आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) तसेच फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी कथित संबंध असलेल्या नऊ संशयितांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला असून देशविघातक कारवायांचा मोठा कट उधळून लावण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील रहिवासी आहेत. त्यांच्यामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. हे आरोपी देशातील महत्त्वाच्या सरकारी व सुरक्षा संस्थांवर तसेच सुरक्षा दलांच्या जवानांवर हल्ले करण्याच्या तयारीत होते.
अणुऊर्जा प्रकल्प, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि वीज निर्मिती प्रकल्प लक्ष्य
तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, या दहशतवादी मॉड्यूलच्या लक्ष्यसूचीत अणुऊर्जा प्रकल्प, विमानतळ, रेल्वे स्थानके आणि वीज निर्मिती केंद्रांसारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधा होत्या. या गटावर सुरक्षा यंत्रणांकडून काही काळापासून गुप्तपणे नजर ठेवण्यात येत होती.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींचे सीमापार दहशतवादी नेटवर्कशी असलेले संबंध, आर्थिक पुरवठ्याचे मार्ग तसेच विदेशातून मिळणाऱ्या निर्देशांचा मागोवा घेतला जात आहे. या मॉड्यूलचे सूत्रधार कोण आहेत आणि त्यांना कोणत्या माध्यमातून मदत पुरवली जात होती, याचाही शोध घेतला जात आहे.
दिल्लीत हाय अलर्ट
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या संभाव्य दहशतवादी धोक्याच्या इशाऱ्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये आधीपासूनच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय दिल्लीतील गर्दीची ठिकाणे, महत्त्वाची कार्यालये आणि सार्वजनिक स्थळांना लक्ष्य करण्यासाठी आत्मघाती हल्ले, वाहनांमध्ये स्फोटके ठेवून हल्ले, गोळीबार किंवा दहशतवादी कारवायांचे प्रयत्न होऊ शकतात, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यामुळे सर्व जिल्हा पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून; गुप्तचर संस्था आणि केंद्रीय सुरक्षा दलांशी सातत्याने समन्वय ठेवण्यास सांगण्यात आले आहे.