काँग्रेसमध्ये खासदारालाही किंमत नाही : खासदार विरियातो

विश्वासात न घेतल्याबद्दल अनेक पदाधिकारी नाराज


30th May, 11:49 pm
काँग्रेसमध्ये खासदारालाही किंमत नाही : खासदार विरियातो

बाणावलीत कार्यकर्त्यांशी बोलताना खासदार विरियातो फर्नांडिस. सोबत इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : प्रदेशाध्यक्षपदावरून अमित पाटकर यांना काढून टाकताना पक्षाने माझ्याशी चर्चा केली नाही किंवा विश्वासात घेतले नाही. पत्रक आल्यानंतरच मला याची माहिती मिळाली. मलाही आवडलेले नाही. काँग्रेसमध्ये खासदारालाही किंमत नाही, असे उद्गार दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी काढले.
बाणावली येथे कार्यक्रमासाठी आलेल्या कॅ. विरियातो फर्नांडिस यांना घेराव घालून राज्यातील विविध भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून अमित पाटकर यांना काढून टाकण्याबाबत विचारणा केली. यावेळी खासदार विरियातो यांनी मलाही याची कल्पना नव्हती, असे स्पष्ट केले. काँग्रेस हा लोकशाहीनुसार चालणारा पक्ष असून कार्यकर्त्यांना व गट समित्यांना न विचारता निर्णय कसा घेतला जातो ? २०२२ मध्ये गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा भार सांभाळला जात नसल्याने राजीनामा दिला होता. जी व्यक्ती त्यावेळी पदासाठी योग्य नव्हती, ती आता निवडणुकांना काही महिने असताना पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी कशी नियुक्त केली जाते ? अमित पाटकर यांनी मागील साडेचार वर्षे पक्ष सांभाळला. जिल्हा पंचायत निवडणुकांतील विजय, लोकसभा निवडणुकीतील यश याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी पैसा व वेळ दोन्ही पक्षाला दिले. बदल करताना केवळ एकट्यालाच का काढण्यात आले, असे प्रश्न केले.
विश्वासात घेण्याची गरज होती : मनीषा
प्रदेशाध्यक्ष पद हे कायमस्वरूपी नसते; पण एक विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली होऊ देणे गरजेचे होते. निर्णय घेताना खासदार म्हणून विरियातो फर्नांडिस यांना आणि गोवा प्रदेश समितीचे सदस्य म्हणून आम्हाला पक्षाने विश्वासात घेण्याची गरज होती. आता लोक ‘सेटिंग’ म्हणून आमच्याकडे पाहत आहेत, असे मनीषा उसगावकर यांनी सांगितले.       

हेही वाचा