प्रदेशाध्यक्षपदावरून भाष्य : गोव्यासाठी लढा सुरूच राहणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : आपणास तत्काळ प्रदेशाध्यक्षपदावरून का काढण्यात आले किंवा कोणासोबत बैठका घेण्यात आल्या, याची माहिती आपणास नाही. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतल्यानंतरच आपणास याबाबत स्पष्टता येईल, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. गोव्यासाठीचा लढा सुरूच राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्यानंतर अमित पाटकर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काँग्रेसचा लढा नेहमीच भाजपविरोधात होता, तो यापुढेही सुरूच राहील. २०२२ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे केवळ ११ आमदार निवडून आले होते. सहा महिन्यांच्या कालावधीत आठ आमदारांनी स्वार्थासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चार वर्षे दोन महिने मला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करता आले. पक्ष संघटना मजबूत करता आली. माझ्यावर विश्वास दाखवला यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आभारी आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात कार्यकर्त्यांना आधार दिला. पक्षांतर रोखायचे असल्यास कार्यकर्त्यांना प्रत्येक निर्णयात विश्वासात घेणे गरजेचे आहे. पक्षाचे कार्यकर्ते, गट समिती हेच पक्षाचा आधार असतात. लोकांच्या भावनांचा विचार करून लोकसभा व इतर निवडणुकांना सामोरे गेलो होतो. समाजासाठी चांगले काहीतरी करण्यासाठी सर्वकाही सोडून राजकारणात आलो आहे. त्यामुळे गोव्याच्या हितासाठी कार्य करत राहणार. राजकारणात लोकांना पाहिजे तसेच होते. २०२२ मध्ये कुडचडेची जागा आरजीच्या उमेदवारामुळे मतविभागणी झाल्याने कमी मतांनी हरलो होतो. प्रदेशाध्यक्ष पद नसल्याने कुडचडेतील मतदारांना जास्त वेळ देता येणार आहे. मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करता येणार आहे, असेही पाटकर यांनी सांगितले.
शुक्रवारी मी बाणावली गट काँग्रेस समितीची बैठक प्रदेशाध्यक्ष म्हणून घेतली. तेव्हा मलाही ही बैठक शेवटची असेल असे माहीत नव्हते. मीही माणूस असून मलाही भावना आहेत. त्यामुळे थोडे भावनिक झालो आहे.
_ अमित पाटकर, माजी प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस