'इंडिया पोस्ट’कडून बक्षीस मिळण्याचा मेसेज व्हायरल

नवी दिल्ली : सोशल मीडियावर ‘इंडिया पोस्ट’च्या नावाने फिरणारा एक मेसेज सध्या तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नागरिकांना मोफत भेटवस्तू आणि बक्षिसे देण्याचा दावा केला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फर्मेशन ब्युरो’च्या फॅक्ट चेक युनिटने या मेसेजची पडताळणी करून हा दावा पूर्णपणे बनावट आणि खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. 'डाक सेवा गिफ्ट्स' नावाने सुरू असलेल्या या योजनेशी भारतीय डाक विभागाचा कोणताही संबंध नाही, असे 'पीआयबी'ने म्हटले आहे.
व्हाट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या या संदेशात, युजर्सना एका लिंकवर क्लिक करण्यास आणि काही वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले जात आहे. असे केल्यास ‘डाक सेवा गिफ्ट्स’ अंतर्गत बक्षिसे मिळतील, असे प्रलोभन दाखवले जात आहे. 'पीआयबी'ने आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून नागरिकांना सावध केले आहे. डाक विभाग अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची सबसिडी, बोनस, बक्षीस किंवा सर्वेक्षण आधारित योजना राबवत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
अशा लिंक्स केवळ नागरिकांची बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा वैयक्तिक ओळखपत्रांचे क्रमांक चोरण्यासाठी तयार केल्या जातात. या लिंक्सवर क्लिक केल्यास मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये मालवेअर शिरण्याचा आणि सायबर फसवणूक होण्याचा मोठा धोका असतो. यापूर्वी २०२२ मध्येही अशाच प्रकारचा घोटाळा समोर आला होता, तेव्हाही सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
यासोबतच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाने सुरू असलेल्या आणखी एका मोठ्या 'क्वांटम एआय' गुंतवणूक घोटाळ्याचाही 'पीआयबी'ने पर्दाफाश केला आहे. यामध्ये सुरुवातीला २२,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा ३ लाख रुपये मिळतील, असे खोटे आमिष दाखवले जात होते. केंद्रीय अर्थमंत्री किंवा भारत सरकार अशा कोणत्याही योजनेचे समर्थन करत नसून, नागरिकांनी अशा फसव्या गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.
कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास तो पुढे फॉरवर्ड न करता, त्याची सत्यता सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी आणि अशा संशयास्पद लिंक्सची माहिती 'पीआयबी' फॅक्ट चेक टीमकडे पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.