जमिनीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

विजापूर : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गावातील दोन कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. या वादाचे रूपांतर अखेर रक्तरंजित संघर्षात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन गोळीबार केला आणि सहा जणांची क्रूरपणे हत्या केली.
या घटनेत चंदू निराळे, दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर नदाफ यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची नेमकी संख्या आणि घटनेचे स्वरूप याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून; आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.