युगांडातून नागपुरात परतलेली व्यक्ती विलगीकरणात; कर्नाटकातील महिलेची चाचणी निगेटिव्ह

अहमदाबाद: आफ्रिकेतील इबोला उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर भारतात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अद्याप देशात एकही इबोला रुग्ण निश्चित झालेला नाही. मात्र गुजरातमध्ये पहिला संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील नागपुरात युगांडाहून परतलेल्या एका व्यक्तीला खबरदारीचा उपाय म्हणून २१ दिवसांच्या गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
गुजरातमध्ये संशयित रुग्ण
गुजरातमधील वडोदरा येथे काँगोमधून आलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीमध्ये इबोलासदृश लक्षणे दिसून आल्याने त्याला अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. गुजरातचे मंत्री प्रफुल्ल पानसेरिया यांनी सांगितले की, संबंधित व्यक्ती व्यवसायाच्या निमित्ताने काँगोमधून मुंबईमार्गे वडोदऱ्यात आली होती. त्याला ताप आणि सर्दीची लक्षणे असून; इबोलाची अद्याप पुष्टी झालेली नाही. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नागपुरातील व्यक्तीवर देखरेख
नागपुरातील ४७ वर्षीय व्यक्ती नुकतीच युगांडाहून परतली आहे. सध्या त्याच्यामध्ये इबोलाची कोणतीही लक्षणे आढळलेली नसली तरी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. आरोग्य नियमांनुसार वैद्यकीय पथक नियमित तपासणी करणार असून; लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र ‘आयसोलेशन’ वॉर्डही सज्ज ठेवण्यात आला आहे.
कर्नाटकातील महिलेची चाचणी निगेटिव्ह
कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये युगांडाहून आलेल्या २८ वर्षीय महिलेचीही इबोलाची चाचणी करण्यात आली होती. मात्र तिचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी दिली. संबंधित महिलेला अंगदुखीसारखी सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर तिला सरकारी संसर्गजन्य रोग रुग्णालयात हलविण्यात आले होते.
इबोला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काँगो आणि युगांडामधील सुरू असलेल्या इबोला उद्रेकाला १७ मे रोजी आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. इबोला हा अत्यंत गंभीर आणि अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य आजार मानला जातो. संक्रमित व्यक्तीच्या रक्त, शारीरिक द्रव्ये किंवा दूषित वस्तूंच्या संपर्कातून हा विषाणू पसरू शकतो.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये : केंद्रीय आरोग्य मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून; नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.