सोन्या-चांदीला नवा पर्याय; बाजारात पहिल्यांदाच आले 'तांब्याचे बार'

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
2 hours ago
सोन्या-चांदीला नवा पर्याय; बाजारात पहिल्यांदाच आले 'तांब्याचे बार'

पुढील वर्षभर सोने-चांदीची खरेदी कमी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर आता बाजारात त्याचे थेट पडसाद उमटू लागले आहेत. सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या बजेटला चाप बसला असतानाच, आता छोटे गुंतवणूकदार आणि मध्यमवर्गीयांसाठी ‘तांब्याच्या बार’मध्ये गुंतवणुकीचा एक नवा आणि खिशाला परवडणारा मार्ग खुला झाला आहे. 

एरव्ही तांब्याच्या भावात प्रति किलो केवळ ५० ते १०० रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत असे. मात्र, गेल्या अवघ्या दोन महिन्यांत तांब्याचे दर प्रति किलो १,१०० रुपयांवरून थेट २,००० रुपयांवर पोहोचले आहेत. भाव झपाट्याने वाढल्यामुळे, पूर्वी केवळ भांडी आणि औद्योगिक वापरापुरते मर्यादित असलेले तांबे आता गुंतवणुकीचे एक भक्कम माध्यम बनले आहे. सध्या बाजारात १०० ग्रॅम, ५०० ग्रॅम आणि १,००० ग्रॅम वजनाचे ‘९९९’ शुद्धतेचे प्रमाणित बार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहने, सौर ऊर्जा आणि डेटा सेंटर उद्योगांमधील वाढत्या वापरामुळे जागतिक स्तरावर तांब्याला ‘भविष्यातील सोने’  म्हणून संबोधले जात आहे.

तांब्याच्या बारचे सध्याचे दर:

* १०० ग्रॅम : ५०० रुपये

* ५०० ग्रॅम : १,५०० रुपये

* १,००० ग्रॅम : २,००० रुपये

भारतात प्रामुख्याने राजस्थान, झारखंड आणि मध्य प्रदेशात तांब्याचे उत्पादन होते; परंतु देशांतर्गत वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी चिली, ऑस्ट्रेलिया आणि पेरू या देशांतून मोठ्या प्रमाणावर तांब्याची आयात करावी लागत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले की, शहरात प्रायोगिक तत्त्वावर १ किलो वजनाच्या ३० हून अधिक विटांची विक्री झाली असून, भविष्यातील नफा लक्षात घेऊन व्यापारीही याचा साठा करत आहेत. बाजार तज्ज्ञांच्या मते, तांब्याची तातडीने विक्री केल्यास मोडच्या भावात (स्क्रॅप) प्रति किलो ६०० रुपयांचे नुकसान सोसावे लागू शकते. मात्र, वाढती औद्योगिक गरज पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय वर्षभरानंतर अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा