अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; तीन दिवसांत अमेरिकेचे इराणवर दुसऱ्यांदा हल्ले

कुवेतवर क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न; लेबनॉनमधील दक्षिणेकडील भाग ‘युद्ध क्षेत्र’ घोषीत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
अमेरिका-इराण संघर्ष तीव्र; तीन दिवसांत अमेरिकेचे इराणवर दुसऱ्यांदा हल्ले

तेहरान : अमेरिकेने (USA-Iran War) इराणमधील लष्करी ठिकाणांवर नव्याने हवाई हल्ले केल्याने मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत अमेरिकेने दुसऱ्यांदा इराणवर हल्ले केले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिकन सैन्याने सागरी वाहतुकीला धोका निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.

इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने अब्बास बंदर परिसरातील ठिकाणांवर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

इराणचे अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ले

दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून “अमेरिकन हवाई तळावर” कारवाई केल्याचा दावा केला आहे. तसेच, अमेरिकेची आक्रमक भूमिका कायम राहिल्यास आणखी कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही

इराणने दिला आहे.

कुवेतने क्षेपणास्त्रे, ड्रोन रोखले

कुवेतच्या लष्करानेही त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने “शत्रुत्वपूर्ण” क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखल्याचे सांगितले. मात्र, हा हल्ला नेमका कुठून झाला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

लेबनॉनमधील दक्षिणेकडील भाग ‘युद्ध क्षेत्र’ घोषीत 

याच वेळी, इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील नागरिकांना झहरानी नदीच्या उत्तरेकडे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. झहरानी नदीच्या दक्षिणेकडील सर्व भाग आता “युद्ध क्षेत्र” घोषित करण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

परिस्थिती गंभीर

मानव हित व  मदतीसाठी कार्यरत संस्थांनी दक्षिण लेबनॉनमध्ये “पूर्ण मानवी संकट” निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांमुळे आणि तीव्र होत असलेल्या भू-आक्रमणामुळे परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

इराणवरील निर्बंध सैल करण्यास अमेरिकेचा नकार

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामासाठी चर्चेच्या मुद्द्यावरही विरोधाभासी विधाने समोर आली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील निर्बंध सैल करण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा