कार चालकाने अन्य वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिली.

जोयडा : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगर-अनमोड मार्गावर गवेगाळी क्रॉस येथे गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आंध्र प्रदेश पासिंगची एक कार गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने प्रवास करत होती. त्याच वेळी, गोव्यातील केपे येथील एक व्यावसायिक टेम्पो कर्नाटकातून बॉयलर कोंबड्या घेऊन रामनगर-अनमोड मार्गाने गोव्याच्या दिशेने जात होता. साधारण दीड वाजण्याच्या सुमारास गवेगाळी क्रॉस परिसरात स्विफ्ट कारचालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात विरुद्ध दिशेने जाऊन बोलेरो टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात स्विफ्ट कारमध्ये पुढे बसलेले मुरली आणि महेश (दोघेही रा. आनंदपूर, आंध्र प्रदेश) हे जागीच ठार झाले. तर स्विफ्ट कारमध्ये मागे बसलेले शेख वाली, तसेच बोलेरो टेम्पोमधील कलप्पा मादार आणि त्यांची पत्नी द्राक्षायणी मादार (मूळ रा. विजापूर, सध्या गोव्यात वास्तव्यास) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आणि वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून तातडीने प्रथम रामनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजते.
या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर रामनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.