
बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार ३ जून रोजी कर्नाटकचे २५ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बंगळुरू येथील लोकभवन ग्लास हाऊस येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यास काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, पक्ष कार्यकर्ते आणि राज्यभरातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ६४ वर्षीय शिवकुमार यांच्यासह आठ ते दहा मंत्र्यांनाही शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार १८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांनंतर केला जाऊ शकतो.
सिद्धरामय्या यांनी जवळपास अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नेतृत्वबदलाचा मार्ग मोकळा केला. काँग्रेस हायकमांडच्या सूचनेनुसार त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या निर्णयाची माहिती देताना शिवकुमार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार हे प्रमुख दावेदार मानले जात होते. त्यानंतर राज्यात "रोटेशनल मुख्यमंत्री" फॉर्म्युल्याबाबत चर्चा सुरू होती. त्यानुसार सिद्धरामय्या अडीच वर्षांनंतर पद सोडतील आणि उर्वरित कार्यकाळासाठी शिवकुमार मुख्यमंत्री होतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.
शिवकुमार यांची आज होणार विधिमंडळ नेतेपदी निवड
दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची शनिवारी औपचारिक निवड होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी अधिकृतरीत्या आमंत्रित करण्यात येईल. नवीन मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत काँग्रेस नेतृत्व, सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात दिल्लीत सलग बैठका सुरू असून; विद्यमान मंत्र्यांसह काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भविष्यातील रणनीतीचा भाग
कर्नाटकातील या नेतृत्वबदलाकडे काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय रणनीतीचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जात असून; नव्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कोणत्या दिशा आणि प्राधान्यक्रमांसह पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.