गोव्यातून ९ जणांना अटक; गुजरात सीआयडीची कारवाई

गांधीनगर: देशभरात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांच्या (cyber crime) पार्श्वभूमीवर गुजरात सीआयडीच्या (CID सायबर ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ने मोठी कारवाई करत तब्बल ७७ कोटी रुपयांच्या सायबर फसवणूक (cyber scam) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी १६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ते ‘म्युल’ बँक खात्यांद्वारे फसवणुकीचे पैसे फिरवत असल्याचे उघड झाले आहे.
सीआयडीच्या माहितीनुसार, संशयितांनी २६० हून अधिक म्युल बँक खाती तयार करून देशभरातील सायबर गुन्ह्यांतील रक्कम हस्तांतरित करण्यासाठी वापरली. या रॅकेटचा संबंध ३७५ सायबर गुन्ह्यांशी असून; एकूण व्यवहार ७७ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत गोवा, बडोदा आणि पालनपूर येथे छापे टाकण्यात आले. त्यात गोव्यातून ९, बडोद्यातून ५ आणि पालनपूरमधून २ संशयितांना अटक करण्यात आली. संशयितांकडून मोबाईल फोन, चेकबुक, पासबुक, रिकामे धनादेश, राऊटर, सिम कार्ड, पेन ड्राइव्ह, डेबिट कार्ड आणि क्यूआर कोडसह विविध साहित्य जप्त करण्यात आले.
तपासात असे आढळले की, आरोपी स्वतःच्या तसेच इतरांच्या नावावर बँक खाती उघडून त्याची माहिती सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गेमिंग घोटाळ्यातील सहकाऱ्यांना पुरवत होते. याशिवाय त्यांनी तीन बनावट कंपन्यांची स्थापना करून या खात्यांचे जाळे अधिक मजबूत केले होते.
लॅपटॉप आणि मोबाईल तपासणीत बँक लॉगिन माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच सायबर फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे सापडली. तसेच संशतियांचे दुबईसह इतर परदेशातील व्यक्तींशी व्हॉट्सअॅप व टेलिग्रामवर संपर्क असल्याचे उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांसाठी पोलिसांचा इशारा:
कोणत्याही परिस्थितीत आपली बँक खाते माहिती इतरांसोबत शेअर करू नका.
कमिशनच्या आमिषाला बळी पडून खाते वापरू देऊ नका.
बँक खाते किंवा सिम कार्डची माहिती मागितल्यास तत्काळ पोलिसांना कळवा.
सोशल मीडियावरील जलद नफ्याच्या जाहिरातींपासून सावध राहा.
‘डिजिटल अटक’सारख्या धमक्यांना बळी पडू नका.
१९३० हेल्पलाईनवर संपर्क साधा
सायबर गुन्ह्याचा बळी ठरलात तर त्वरित १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधा. पोलिसांनी नागरिकांना ‘गोल्डन अवर’मध्ये, म्हणजेच पहिल्या तासात तक्रार नोंदवल्यास फसवणुकीची रक्कम परत मिळण्याची शक्यता वाढते, असेही सांगितले आहे.
या पथकाने केली कारवाई
पोलीस महासंचालक सीआयडी गुन्हे आणि रेल्वे के. लक्ष्मी नारायण राव आणि पोलीस महानिरीक्षक (गुन्हे-४), बिपिन अहिरे यांनी सायबर गुन्हेगारी विरोधी मोहिम अधिक तीव्र आणि बळकट करण्याबाबत निर्देश दिले. त्यानंतर पोलीस अधीक्षक राजदीपसिंह झाला, संजयकुमार केशवाला आणि विवेक भेदा यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक के. बी. देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने वरील कारवाई केली.