गोव्यात बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलिसांची धाड; ७ जणांना अटक

अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती आर्थ‌िक फसवणूक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
गोव्यात बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलिसांची धाड; ७ जणांना अटक

पणजी : सायबर गुन्हे शाखेने (Cyber crime Police station)  मोठी कारवाई करत तिसवाडी तालुक्यातील (Tiswadi Taluka)  करमळी येथे भाड्याच्या बंगल्यात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर धाड टाकून ७ जणांना अटक केली आहे. अमेरिकेच्या (USA) नागरिकांची फसवणूक करून मोठी रक्कम उकळण्यात येत होती.  याप्रकरणात सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता सायबर गुन्हे शाखेने व्यक्त केली आहे. 

ही कारवाई १३ एप्रिल रोजी रात्री ११.३० ते १४ एप्रिल पहाटे ४ या दरम्यान करण्यात आली.सायबर गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, संशयितांकडून लॅपटॉप, मोबाईल फोन व अन्य डिजिटल साहित्य मिळून सुमारे २३ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी जय विजय आचार्य (मालाड, मुंबई), योगेश माळी (अहमदाबाद, गुजरात), ऋषभ शहा (गांधीनगर, गुजरात), आशुतोष प्रताप (अहमदाबाद, गुजरात), पार्थ ठक्कर (अहमदाबाद, गुजरात), एड्रियन किनस्टन मारियासेवन (मुंबई) आणि निलेश सिंग (नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे. 

फसवणुकीची पद्धत

संशयित ‘पे-डे’ (Pay-Day)  या नावाने बनावट कर्ज कंपनीचे एजंट असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करीत होते. कर्ज व त्वरित पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागर‌िकांकडून सेफोरा, मॅकीस, अॅप्पल ग‌िफ्ट कार्ड, रेझर गोल्ड, ग्रीन डॉट मनी पॅक यांसारख्या कार्ड्सच्य माध्यमातून मोठ्या रकमा उकळत होते. 

सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखाली ही धाड टाकण्यात आली. त्यात उपनिरीक्षक नवीन नाईक, हवालदार योगेश खांडेपारकर, विरेंद्र वाडकर यांचा या पथकात समावेश होता. पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  याप्रकरणी आणखी काहीजणांचा शोध घेतला जात आहे. 

हेही वाचा