वेतनवाढीच्या मुद्यावरून नोएडात सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार; ३०० हून अधिक जणांना अटक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
वेतनवाढीच्या मुद्यावरून नोएडात सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार; ३०० हून अधिक जणांना अटक

नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा येथील औद्योगिक क्षेत्रात वेतनवाढीच्या मागणीवरून सुरू असलेल्या कामगार आंदोलनाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. सोमवारी झालेल्या प्रचंड जाळपोळीनंतर, मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा  कामगार आक्रमक झाले. परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

सोमवारी झालेल्या हिंसाचारात ३५० हून अधिक कारखान्यांची तोडफोड करण्यात आली होती आणि ५० हून अधिक वाहने जाळण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश कंपन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तरीही काही ठिकाणी कामगार रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांच्या गाड्यांना लक्ष्य केले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आता ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. युपीचे पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३०० हून अधिकांना अटक करण्यात आली.

दुसरीकडे, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने कामगारांच्या मागण्यांवर तातडीने विचार केला आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर राज्य सरकारने कामगारांच्या किमान वेतनात ३००० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही नवीन वेतनवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. मात्र, या निर्णयाची अधिकृत माहिती सर्व कामगारांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच काही ठिकाणी अफवांमुळे पुन्हा हिंसाचार झाला. 

युपीचे पोलीस महासंचालक राजीव कृष्ण यांनी कठोर इशारा दिला आहे की, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांकडूनच या नुकसानीची भरपाई केली जाईल. जे कामगार परराज्यातील किंवा इतर जिल्ह्यांतील आहेत, त्यांच्या घरी जाऊन कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्यांना तुरुंगात धाडले जाईल. सध्या नोएडातील सेक्टर ५८, ५९, ६२ आणि ६३ यांसारख्या संवेदनशील भागांत पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सरकार आणि प्रशासन आता उद्योगांमधील शांतता आणि कामगारांचे हित यांच्यात समन्वय साधण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा