महाराष्ट्राच्या मुरबाडमध्ये काळजाचा थरकाप; सिमेंट मिक्सर ट्रक-व्हॅन धडकेत ११ प्रवासी ठार

रैता पुलावर भीषण अपघात, मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश; महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th April, 03:49 pm
महाराष्ट्राच्या मुरबाडमध्ये काळजाचा थरकाप; सिमेंट मिक्सर ट्रक-व्हॅन धडकेत ११ प्रवासी ठार

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात सोमवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. मुरबाडजवळील गोविलो गावातील रैता पुलावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि प्रवाशांनी भरलेल्या व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात व्हॅनमधील ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये आठ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास हा अपघात घडला. संबंधित व्हॅन ही नेहमीच्या प्रवाशांना घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने जात होती. रैता पुलावर व्हॅन पोहोचली असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने व्हॅनला जोरदार धडक दिली. यात व्हॅनचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांचा वेग प्रचंड असल्याने दोघाही चालकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. अपघातानंतर व्हॅनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी खुप प्रयत्न केले.

मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी घटनेची पुष्टी केली असून, जखमींना तात्काळ उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे कल्याण ते अहिल्यानगर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, परिणामी प्रवाशांचे मोठे हाल झाले. आतापर्यंत सहा मृतांची ओळख पटली असून उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. भरधाव वेग आणि पुलावरील अरुंद रस्ता या भीषण दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


हेही वाचा