आजपासून 'होर्मुझ'वर अमेरिकेची नाकाबंदी; जागतिक तेल बाजार पेटला

इराणची नौसेना उद्ध्वस्त केल्याचा ट्रम्प यांचा दावा; कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर पार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
आजपासून 'होर्मुझ'वर अमेरिकेची नाकाबंदी; जागतिक तेल बाजार पेटला

वॉशिंग्टन/तेहरान : अण्वस्त्र कार्यक्रमावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर आता थेट संघर्षात झाले असून, अमेरिकेने आजपासून होर्मुझ सामुद्रधुनीवर अधिकृतपणे नाकाबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी ७:३० वाजल्यापासून इराणच्या बंदरांकडे ये-जा करणाऱ्या सर्व व्यापारी जहाजे रोखली जाणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे जागतिक स्तरावर युद्धाचे ढग गडद झाले असून, ऊर्जा क्षेत्रातील वाहतूक ठप्प होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना सांगितले की, इराणची तेल विक्री पूर्णपणे बंद करणे हाच या नाकेबंदीचा मुख्य उद्देश आहे. ट्रम्प यांनी दावा केला आहे की, अमेरिकेने इराणच्या नौदलाचे कंबरडे मोडले असून आतापर्यंत इराणचे १५८ युद्धजहाज उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर अमेरिकेने हे कठोर पाऊल उचलले असून, आता इराणवर पुन्हा एकदा मोठे लष्करी हल्ले करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. व्हाईट हाऊसने 'सर्व पर्याय खुले' असल्याचे सांगून जगाला युद्धाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे.

या नाकेबंदीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडचे दर १०२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले असून वाहतूक कोंडीमुळे जहाजांनी आपले मार्ग बदलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इराणनेही याला प्रत्युत्तर देण्याचे संकेत दिले असून होर्मुझ सामुद्रधुनी आपल्या नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. तिथून जाणाऱ्या जहाजांना रियाल या इराणी चलनात टोल भरावा लागेल, असे इराणने जाहीर केले आहे. याशिवाय, इराणला मदत करणाऱ्या चीनलाही ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे, इस्रायलने लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने पश्चिम आशियातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.


हेही वाचा