विशेष तपास पथकामार्फत आयटी कंपनीतील अंतर्गत व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. नाशिक एटीएस आणि आयबीचाही समांतर तपास सुरू.

नाशिक : भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'ने (TCS) नाशिक येथील आपल्या युनिटमध्ये घडलेल्या लैंगिक छळ आणि कथित धर्मांतर प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात नाव आलेल्या आणि तपास सुरू असलेल्या सर्व संशयित कर्मचाऱ्यांना कंपनीने तात्काळ निलंबित केले असून त्यांना कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीने यासंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून कोणत्याही प्रकारच्या छळवणुकीबाबत 'झिरो टॉलरन्स' (शून्य सहनशीलता) धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे.

नाशिकमधील या युनिटमध्ये गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचे गंभीर आरोप होत होते. याप्रकरणी आतापर्यंत नऊ एफआयआर दाखल झाले असून, पोलिसांनी सात संशयितांना अटक केली आहे. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसीफ अत्तर आणि दानिश शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारीनुसार, या संशयितांनी महिला सहकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार केले, तसेच त्यांना गोमांस खाण्यासाठी प्रवृत्त करणे आणि हिंदू देव-देवतांची विटंबना करणे असे धक्कादायक प्रकार केले. या प्रकरणाची व्याप्ती पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याची गंभीर दखल घेतली असून नाशिक पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.

या संपूर्ण कटात कंपनीच्या एचआर विभागाची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुण्यात कार्यरत असलेल्या एका महिला एचआर अधिकाऱ्याने पीडितांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. हे प्रकरण मार्च महिन्यात एका पीडित महिलेने धाडस करून तक्रार केल्यानंतर उघडकीस आले. त्यानंतर एकामागून एक आठ महिला आणि एका पुरुषाने समोर येऊन आपली आपबिती सांगितली. सध्या नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत या प्रकरणाच्या चौकशीसाठी 'एसआयटी' स्थापन करण्यात आली असून, कंपनी प्रशासनाने पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या कारवाईमुळे आयटी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.