सरकारच्या सर्व सूचनांचे पालक करून देवी लईराई जत्रेचे आयोजन; देवस्थान समिती

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
1 hours ago
सरकारच्या सर्व सूचनांचे पालक करून देवी लईराई जत्रेचे आयोजन; देवस्थान समिती

पणजी : २१ ते २५ एप्रिल दरम्यान होणाऱ्या देवी लईराईच्या (Shri Lairai Devi)  वार्षिक जत्रोत्सवात (Jatra) सरकारने केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. देवीचे दर्शन घेण्यास धोंडांसह सामान्य भाविकांना परवानगी आहे.

मात्र केवळ धोंडांसाठी असणाऱ्या धार्मिक विधींमध्ये अन्य लोकांनी सहभागी होऊन गर्दी करू नये असे आवाहन देवस्थान (Temple)  समिती कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष  दीनानाथ गावकर यांनी केले. सोमवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भास्कर गावकर, आतिश गावकर, दयानंद गावकर, वासुदेव गावकर, प्रकाश गावकर व अन्य उपस्थित होते. 

दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, मागील वर्षी झालेल्या दुर्घटनेमुळे यंदा जत्रोत्सवात भाविकांना परवानगी नाही असा चुकीचा समज पसरला आहे. मात्र यंदा देखील सर्व भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. दर्शन घेताना काही नियम पाळणे आवश्यक आहे.

कार्यकारी मंडळांने जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, वाहतूक, आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. जत्रोत्सवात भाविकांनी झिगझॅग पद्धतीच्या रांगांद्वारे सोडण्यात येईल. यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सामान्य भाविकांसाठी तसेच धोंडांसाठी वेगवेगळे मार्ग असणार आहेत. 

ते म्हणाले, जत्रोत्सवादरम्यान परिसरात नजर ठेवण्यासाठी ९२ सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera)  बसवण्यात आले आहेत. याचा खर्च देवस्थानाने केला आहे. यादरम्यान दुकानांमुळे रस्ते अरुंद होऊ नयेत यासाठी यंदा केवळ ३४ दुकानांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

यातील ९ दुकाने होमकुंडाच्या वरील भागात तर २५ दुकाने मंदिराच्या मागील बाजूस असतील. सरकारच्या सूचनेप्रमाणे आम्ही बॅरिकेट करण्याचे काम सुरू केले आहे. जत्रे पूर्वी हे काम पूर्ण होईल. सभा मंडप वगळता अन्य ठिकाणी बॅरिकेट घातले जातील. भाविकांनी यात्रेदरम्यान गडबड गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.