
पणजी : फोंडा पोटनिवडणुकीसाठी (Ponda By-election) पोस्टल बॅलट झाल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी पोटनिवडणूक रद्द करण्याच्या निवाड्याला काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान याचिका दाखल करण्यात आली असून; या आठवड्यात ती सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
अ. भा. काँग्रेस (Congress) समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोग (Election commission) व इतर संबंधीतांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. यासाठी पोटनिवडणूक घेण्याची अधिसूचना १५ मार्च रोजी जारी झाली होती. पोटनिवडणूक ९ एप्रिल रोजी होणार होती. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासह जाहीर प्रचारही संपुष्टात आला होता.
टपालाव्दारे मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दुपारी पोटनिवडणूक रद्द करण्याचा निवाडा एका याचिकेवर दिला. या निवाड्यामुळे निवडणुकीसाठी झालेला कोट्यांनी रूपयांचा खर्च वाया गेला आहे. उमेदवार तसेच राजकीय पक्षांचे श्रमही वाया गेले आहेत. मुख्य म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत फोंडा मतदारसंघ विनाआमदार राहणार आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा व उच्च न्यायालयाच्या निवाड्याचा अभ्यास अॅड. कार्लुस फेरेरा यांनी करून याचिकेचा मसुदा तयार केला आहे.