ईएसजीतर्फे पणजीत रंगणार 'पुरुमेंताचे फेस्त

१ ते ३ मे दरम्यान आयोजन : पारंपरिक वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल्सकरिता आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 mins ago
ईएसजीतर्फे पणजीत रंगणार 'पुरुमेंताचे फेस्त

पणजी : गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (ईएसजी) येत्या मे महिन्यात ‘पुरुमेंताचे फेस्त’ आयोजित करण्यात येणार असून, या उत्सवात गोव्याच्या पारंपरिक खाद्यपदार्थांबरोबरच विविध हस्तकला व स्थानिक उत्पादनांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. हा फेस्त पणजीतील आयनॉक्स कोर्टयार्ड येथे होणार आहे.
ईएसजीतर्फे १ ते ३ मे या कालावधीत मल्टिप्लेक्स कोर्टयार्डमध्ये या फेस्तचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक वस्तू, कृषी उत्पादने आणि स्थानिक कलाकुसरींचे प्रदर्शन व विक्री यासाठी विविध स्टॉल्स उभारले जाणार आहेत.
या तीन दिवसांच्या फेस्तसाठी स्टॉलचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. ६ बाय ६ फूट स्टॉलसाठी ६०० रुपये, तर १० बाय १० फूट स्टॉलसाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ईएसजीकडून गोव्यातील कारागीर, स्वयं-साहाय्य गट, उद्योजक आणि खाद्य विक्रेत्यांना स्टॉलसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज फॉर्म ईएसजी कार्यालयात तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे. अधिक माहितीसाठी ७८८७४३४०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्टॉलचे वाटप ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केले जाणार आहे.

या फेस्तमुळे गोव्याच्या पारंपरिक वारशाचे जतन होण्यास मदत होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. विशेषतः पर्यटकांसाठी हा उत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. तसेच, नवउद्योजकांना आपल्या उत्पादनांचे विपणन करण्यासाठी एक प्रभावी मंच उपलब्ध होणार आहे.
विविध वस्तू, खाद्यपदार्थांचे प्रदर्शन
या फेस्तमध्ये खारे पदार्थ, कृषी व मसाले उत्पादने, पारंपरिक मिठाया, घरगुती अवजारे, मातीची भांडी, सिरेमिक वस्तू, रोपवाटिका, बागायती उत्पादने, थंड पद्धतीने तयार केलेले तेल, हंगामी फळांवर आधारित उत्पादने (काजू, कोकम, चिंच), घरगुती खाद्यपदार्थ जसे लोणचे, मसाले, पापड तसेच पारंपरिक मासेमारी साधने आणि देशी धान्य व तृणधान्यांचा समावेश असणार आहे.

हेही वाचा