कुडतरीच्या 'मायतळे' तळ्यात मिळाली बंपर मासळी

शेतकऱ्यांनी केली वाटणी; यंदा तळ्यातील गाळ उपसा करण्याचा मानस

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
59 mins ago
कुडतरीच्या 'मायतळे' तळ्यात मिळाली बंपर मासळी

मडगाव: कुडतरी येथील मायतळे परिसरातील तळ्यात जाळ्याद्वारे मासेमारी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात मासळी मिळाली असून, यावर्षी मासळीची विक्री न करता शेतकऱ्यांनी ती आपापसात वाटून घेतली आहे. तसेच, यावर्षी तळ्यातील गाळ उपसा करून स्वच्छता करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

कुडतरी येथील मायतळे परिसरातील शेतकरी एकत्र येऊन ऑक्टोबर महिन्यात तळ्यात मासळीचे बीज टाकतात. या मासळीच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून तळ्याचे बांध बांधणे व इतर दुरुस्तीची कामे केली जातात. शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्री आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याकडून उपलब्ध करून दिली जात असल्याने, शेतकऱ्यांवर जास्त आर्थिक भार येत नाही. सध्या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तो उपसण्याची गरज आहे. त्यामुळे यावर्षी मासेमारीला लवकर सुरुवात करण्यात आली आहे.

मासळीचा हंगाम संपल्यावर तळ्यातील गाळ उपसा करून स्वच्छता करण्याचे आश्वासन आमदार रेजिनाल्ड यांनी दिले आहे. यावेळच्या मासेमारीत चोणक, केटला, तिलापी आणि रोहू अशी उत्तम मासळी मिळाली आहे. सध्या आवश्यक तेवढीच मासळी पकडण्यात आली असून, काही दिवसांनी पुन्हा मासेमारी केली जाईल, असे स्थानिक रुई मिनेझिस यांनी सांगितले.

हेही वाचा