राज्यातील सेंद्रिय काजू उत्पादकांना सुवर्ण संधी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
50 mins ago
राज्यातील सेंद्रिय काजू उत्पादकांना सुवर्ण संधी

पणजी : सध्या जगभरात सेंद्रिय कृषी उत्पादनांची मागणी वाढत आहे. गोव्यातील ८० ते ९० टक्के काजू उत्पादन हे सेंद्रिय पद्धतीनेच होते. यामध्ये कोणतीही रसायने वापरली जात नाहीत. त्यामुळे गोव्यातील काजू उत्पादकांनी या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्यावा; असे आवाहन सेंद्रिय काजू (Organic cashew) उत्पादक आग्नेलो बार्रेटो यांनी केले. 

शनिवारी काजू महोत्सवाच्या (Cashew festival)  तांत्रिक चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. देसाई, काजू उत्पादक विंदेश शिरोडकर, गोवा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंकळकर उपस्थित होते. 

बार्रेटो यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत जगभरात कर्करोगासारखे (Cancer)  असंससर्गजन्य रोग वाढत आहेत. पिकांमध्ये रासायनिक खतांचा (Chemical fertilizer)  अति प्रमाणात वापर केल्यामुळे देखील असे होऊ शकते. 

जगभरात निरोगी जीवनशैली, पोषक अन्नाला प्राधान्य दिले जात आहे. गोव्यातील (Goa)  सेंद्रिय काजू उत्पादकांनी याचा फायदा करून घ्यावा. त्यांनी आपल्या सेंद्रिय काजूचे योग्य पद्धतीने मार्केटिंग केल्यास नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो. मी काही वर्षांपूर्वी तण काढण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर केला होता. मात्र यामुळे मला तोटेच अधिक झाले. 

रसायनांचा वापर केल्यानंतर तण गेले तरी काहीच वर्षांत काजूचे उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत कमी झाले. शिवाय काजूसह नारळाला किड लागली. यानंतर मी रसायनांचा वापर पूर्णपणे बंद केला. जमीन पुन्हा सेंद्रिय होण्यास पाच ते आठ वर्षांचा कालावधी लागला.

काजूच्या भोवतीची तण काढण्याची प्रक्रिया वेळ खाऊ असली तरी रसायनांचा वापर कदापिही करू नये हा धडा मी शिकलो आहे. सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी सरकारने देखील धोरणे तयार केली पाहिजेत. सेंद्रिय उत्पादनांना अधिक दर मिळाला पाहिजे. असे झाले तरच तरूण पिढी या क्षेत्रात येईल. 

डॉ. सुरेश कुंकळकर म्हणाले की, सेंद्रिय काजू शेतीला भविष्यात मोठी मागणी येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केल्यास त्यांचा फायदा होणार आहे. पालापाचोळा, जनावराचे मलमूत्र आदींचा वापर खत म्हणून करता येऊ शकतो.

गोव्यातील काजूची चव वेगळी आणि चांगली आहे. सेंद्रिय पद्धत वापरल्यास ही वेगळी चव कायम टिकून राहते. अशा पद्धतीच्या शेतीला खर्च देखील कमी येतो.  अशा उत्पादनांमध्ये पोषकद्रव्य अधिक असतात.


हेही वाचा