चीनकडून इराणला हवाई संरक्षण प्रणाली; इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर

संघर्षविरामावर प्रश्नचिन्ह

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
चीनकडून इराणला हवाई संरक्षण प्रणाली; इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर

वॉशिंग्टन :  इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या नाजूक संघर्षविरामावर नव्या घडामोडींमुळे ताण वाढताना दिसत आहे. अमेरिकन गुप्तचर अहवालांचा हवाला देत चीन (China)  येत्या काही आठवड्यांत इराणला अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली (New air defecnce systems)  पुरविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लेबनॉनमधील हल्ल्यांमुळे परिस्थिती गंभीर 

दरम्यान, लेबनॉनमध्ये (Lebanon)  इस्रायलने (Israel)  केलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या हल्ल्यांमध्ये ३००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  हिझबुल्लाहवरही संघर्षविराम लागू होतो का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हल्ल्यांची तीव्रता कमी करतील, असे संकेत दिले आहेत.

“कडक प्रत्युत्तर” देण्याचा इराणचा इशारा

इराणने आपल्या सहयोगींवरील हल्ले सुरू राहिल्यास “कडक प्रत्युत्तर” देण्याचा इशारा दिला आहे. तसेच, जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपली पकड कायम ठेवली आहे. या मार्गावरील जहाजांची वर्दळ सामान्यपेक्षा कमी असल्याने जागतिक तेलबाजाराबाबत चिंता वाढली आहे.

आखाती देशांवर परिणाम 

संघर्षाचा परिणाम आखाती देशांवरही दिसू लागला आहे. कुवेतने आपल्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर ड्रोन हल्ल्यांची नोंद केली असून, त्यासाठी इराण आणि त्याच्या समर्थकांना जबाबदार धरले आहे. मात्र, इराणने हे आरोप फेटाळले आहेत. सौदी अरेबियानेही होर्मुझला वळसा घालणाऱ्या तेलवाहिन्यांवर नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. ज्यामुळे ऊर्जा सुरक्षेचे धोके अधोरेखित झाले आहेत.

अनिश्चितता कायम

राजनैतिक स्तरावर प्रयत्न वेग घेत असले तरी अनिश्चितता कायम आहे. इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण चर्चेची तयारी सुरू आहे.  इस्रायलने लेबनॉनसोबत वॉशिंग्टनमध्ये चर्चेची तयारी दर्शवली आहे. दोन्ही बाजूंकडून सावध आशावाद व्यक्त केला जात असला तरी रणांगणावरील हालचाली आणि परस्पर दावे यामुळे स्थायी तोडगा निघण्याचा मार्ग कठीण होत आहे.

लष्करी, आर्थिक आणि भूराजकीय दबाव एकत्र येत असताना, हा संघर्षविराम अधिकच कमकुवत होत चालल्याचे चित्र स्पष्ट होत असून; संपूर्ण प्रदेश तणावाच्या छायेत आहे.

हेही वाचा