तेल कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांची माहिती

पणजी: गोव्यात सध्या दररोज सुमारे १०,६०० घरगुती एलपीजी सिलिंडरचे वाटप होत असून, हा पुरवठा भू-राजकीय घडामोडींपूर्वीच्या पातळीइतकाच स्थिर आहे. राज्यातील सध्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असून सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी वितरणाला प्राधान्य दिले आहे. सिलिंडरचे वितरण निश्चित वेळापत्रकानुसार सुरू आहे, अशी माहिती सरकारी तेल कंपन्यांचे राज्यस्तरीय समन्वयक मधुरेंद्र के. पांडे यांनी दिली आहे.
पांडे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोव्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची उपलब्धता सध्याची मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहे. तेल कंपन्या पुरवठ्याच्या स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत आणि वितरण प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. पुरवठ्यातील स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांनी एसएमएस, मिस्ड कॉल किंवा आयव्हीआरएस (आयव्हीआर) माध्यमातून सिलिंडर बुक करावा. केवळ पात्र लाभार्थ्यांनाच सिलिंडर मिळावा, यासाठी 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' (डीएसी) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकार स्वयंपाकाच्या इंधनासाठी 'पाईप्ड नॅचरल गॅस' (पीएनजी) वापराला प्रोत्साहन देत आहे. सध्या पणजी, मडगाव आणि फोंडा येथे ही सेवा उपलब्ध आहे. उत्तर गोव्यातील ग्राहक 'गोवा नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड' आणि दक्षिण गोव्यातील ग्राहक 'इंडियन ऑईल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेड'च्या पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
ज्या स्थलांतरित कामगारांकडे किंवा तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांकडे पत्त्याचा पुरावा नाही, त्यांना कोणत्याही सरकारी फोटो ओळखीच्या पुराव्यावर आणि एका प्रतिज्ञापत्रावर अधिकृत वितरकांकडून ५ किलोचा फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर खरेदी करता येईल.
काळाबाजारावर कारवाई
पुरवठा नियमित ठेवण्यासाठी तेल कंपन्या वितरकांची तपासणी करत आहेत. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत प्रशासनाने ३०५ धाडी टाकून गैरप्रकार आढळलेल्या प्रकरणांत कडक कारवाई केली आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली.