
पणजी: महिला आणि बाल विकास खात्याने गोव्यातील बाराही तालुक्यातील १०९ अंगणवाड्यांमधील रिक्त पदे भरण्यासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ५१ अंगणवाडी सेविका आणि ६३ अंगणवाडी मदतनीस पदांचा समावेश आहे. या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
महिला आणि बाल विकास खात्याने शुक्रवारी ही जाहिरात प्रसिद्ध करून पात्र महिला उमेदवारांकडून साध्या कागदावर अर्ज मागवले आहेत.
ही पदे पूर्णपणे मानधन तत्त्वावर भरली जाणार आहेत. अंगणवाडी सेविकेसाठी दरमहा १०,००० रुपये आणि मदतनीस पदासाठी दरमहा ६,००० रुपये मानधन दिले जाईल. उमेदवारांनी अर्जात स्वतःचे नाव, वडील किंवा पतीचे नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव (असल्यास) यासह सविस्तर तपशील नमूद करून स्वतःचा फोटो जोडणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षातून किमान ३०० दिवस पूर्णवेळ काम करणे बंधनकारक असेल.
ज्या ब्लॉकमध्ये अंगणवाडी आहे, त्या ठिकाणच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रांसह २२ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करावेत. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि मुलाखतीची तारीख ३० मार्च रोजी संबंधित सीडीपीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केली जाईल. यासाठी स्वतंत्रपणे मुलाखत पत्र पाठवले जाणार नाही.
तालुकानिहाय रिक्त पदांचा तपशील
तालुका अंगणवाड्या सेविका मदतनीस
पेडणे ३ २ १
बार्देश २५ १५ ११
डिचोली ७ ३ ४
सत्तरी ८ ५ ३
तिसवाडी ११ ५ ६
फोंडा १२ ७ ५
सांगे १ १ ०
केपे २ २ ०
मुरगाव १६ ४ १५
सासष्टी १७ ३ १५
काणकोण २ १ १
धारबांदोडा ५ ३ २