ढोलांच्या गजरात, ‘हरहर’च्या जयघोषात मयेनगरी दुमदुमली

‘रेड्याची जत्रा’ उत्साहात : श्री महामाया मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
57 mins ago
ढोलांच्या गजरात, ‘हरहर’च्या जयघोषात मयेनगरी दुमदुमली

डिचोली : गोव्यातील मये गावातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख असलेली प्रसिद्ध ‘रेड्याची जत्रा’ (व्हडली जत्रा) यंदाही पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माशेल येथील ग्रामदैवत श्री पिसो रवळनाथ आणि श्री देवकी कृष्ण यांच्या ‘तरंग’ स्वरूपातील देवतांचे नदीमार्गे मये गावात आगमन झाल्याने उत्सवाची शोभा अधिक वाढली.
जत्रेच्या मुख्य दिवशी पहाटे गावकरवाडा येथील श्री महामाया मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. येथून श्री केळबायदेवीची पेठ, धगधगते माले आणि माशेलहून आलेल्या श्री पिसो रवळनाथांच्या तरंग देवतांचा लवाजमा मोठ्या उत्साहात निघाला. या मिरवणुकीत धोंडगण, चौगुले मानकरी आणि हजारो भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते. वाजत-गाजत हा लवाजमा केळबायवाडा येथील मुख्य स्थळाकडे रवाना झाला.
केळबायवाडा येथे पोहोचल्यानंतर देवतांच्या तरंगांनी चव्हाट्यावर कौल दिला. ‘हर हर’ आणि देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे धगधगते माले (विस्तव) डोक्यावर घेऊन सादर केले जाणारे पारंपरिक नृत्य. देवीच्या मोडाने (अवताराने) हे धगधगते माले डोक्यावर घेत चौगुले आणि धोंडगणांसह चित्तथरारक नृत्य सादर केले. ढोल-ताशांच्या गजरात झालेल्या या नृत्याने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
भाविकांची मांदियाळी
या जत्रेला मये गावासह संपूर्ण गोव्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. माशेल आणि मये या दोन गावांमधील पारंपरिक संबंध या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले. शिस्तबद्ध आयोजन, धार्मिक विधी आणि समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ही जत्रा ग्रामस्थांनी एकजुटीने साजरी केली.

हेही वाचा