कामाच्या ताणामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय

वाळपई : पाडेली-सत्तरी येथील पुलावरून उडी मारून वाळपई येथील जलसिंचन खात्यात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अझिझ शहा (५९, रा. वाळपई) यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सत्तरी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामागील कारणाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ओळख असलेल्या शहा यांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले, याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी प्राथमिक स्वरूपात व्यक्त केलेल्या संशयानुसार, जलसिंचन खात्यातील कामाच्या प्रचंड ताणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत याच खात्यातील हा दुसरा प्रकार असून, दोन वर्षांपूर्वी एका अभियंत्याने असा टोकाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जलसिंचन खात्याच्या कामकाजावर नागरिकांनी संशयाचे बोट ठेवले आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अझिझ शहा हे काही सहकाऱ्यांसह गांजे येथील प्रकल्पाला भेट देण्यासाठी जात होते. दरम्यान, त्यांनी पाडेली येथील पुलावर गाडी थांबवली आणि अचानक पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. उडी घेताना त्यांचे डोके दगडावर आपटल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.
घटनेनंतर त्यांना वाचविण्यासाठी तेथील दोन तरुणांनी प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व गर्दी केली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती व रक्तस्त्राव सुरू होता. मृतदेह वाळपई येथील सरकारी सामाजिक रुग्णालयात आणण्यात आला. दुपारी आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज येथे शवचिकित्सेसाठी पाठविण्यात आला.