खाद्यपदार्थ समजून माकडाने पळवली २ लाखांची बॅग

बुलंदशहरमधील घटना

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
10 mins ago
खाद्यपदार्थ समजून माकडाने पळवली २ लाखांची बॅग

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या कचहरी परिसरात शनिवारी अजब घटना पाहायला मिळाली. जमिनीची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या हातातील दोन लाख रुपयांनी भरलेली बॅग एका माकडाने हिसकावून घेतली आणि थेट झाडावर जाऊन बसला. त्यानंतर झाडावरून झालेल्या नोटांच्या पावसामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण जमिनीच्या रजिस्ट्रीच्या कामासाठी वकिलाच्या चेंबरमध्ये आला होता. चेंबरमधून बाहेर पडून तो स्टॅम्प व्हेंडरकडे जात असताना, एका माकडाने अचानक त्याच्यावर झडप घातली आणि हातातील बॅग पळवून नेली. बॅगमध्ये काहीतरी खाण्याचे सामान असेल या आशेने माकडाने ती उघडली; परंतु त्यात खाण्याऐवजी नोटांचे बंडल निघाले.



बॅगमध्ये नोटांचे बंडल पाहताच माकडाने एक-एक करून ५०० च्या नोटा हवेत फेकायला सुरुवात केली. नोटा हवेत उडू लागल्याने कचहरी परिसरात जणू 'नोटांचा पाऊस' पडल्यासारखे दृश्य निर्माण झाले. पीडित तरुणाने आरडाओरडा केल्यावर आजूबाजूचे वकील, स्टॅम्प विक्रेते आणि नागरिक गोळा झाले. कायदेशीर कामे बाजूला ठेवून सर्वांनी रस्त्यावर पडलेले पैसे गोळा करण्यास सुरुवात केली.

सुदैवाने, घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रामाणिकपणा दाखवला. लोकांनी गोळा केलेले पैसे प्रामाणिकपणे त्या तरुणाच्या सुपूर्द केले. दोन लाखांपैकी सुमारे १ लाख ९८ हजार रुपये तरुणाला परत मिळाले, तर केवळ २ हजार रुपये गायब झाले. या अजब घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, झाडावरील माकड आणि खाली पैसे गोळा करणारे लोक पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा