कारचालक तरुणी दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती

पणजी : वेर्णा बायपासवर गुरुवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. नवजात बालकांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एका कारने जोरदार धडक दिली. मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दिशेने ही रुग्णवाहिका जात असताना वेर्णा बगल रस्त्यावर हा अपघात झाला. सुदैवाने, या भीषण धडकेनंतरही रुग्णवाहिकेतील सर्व नवजात बालके आणि वैद्यकीय कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका बालकांना घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या कारने तिला धडक दिली. या अपघातातील कारचालक तरुणी दारूच्या नशेत असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र बालके सुरक्षित असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी दूर केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे निष्पाप जीवांना धोका निर्माण झाल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या वेर्णा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून कारचालक तरुणीची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.