आरपीएफची 'ऑपरेशन सतर्क' अंतर्गत कारवाई

मडगाव : मडगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी ७.४ किलो गांजा जप्त केला असून, याची किंमत सुमारे ७.५ लाख रुपये आहे. याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पणजी येथील अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या (NCB) स्वाधीन करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेल्या आरपीएफ कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असताना दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्या. गाडी क्रमांक १२६१८ 'मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस'मधून उतरलेल्या या प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील बॅगांची झडती घेतली असता, त्यात ७.४ किलो गांजा आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत अंदाजे ७,५०,००० रुपये इतकी आहे. आरपीएफने तातडीने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन मडगाव रेल्वे पोलीस कार्यालयात नेले.
ही कारवाई मडगाव रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन मिश्रा यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरजीत कुमार, कॉन्स्टेबल राम प्रकाश मीना आणि रमेश कुमार यांनी केली. पुढील कायदेशीर तपासासाठी रेल्वे पोलिसांनी संशयित आणि मुद्देमाल पणजी येथील अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपवला असून, एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.