सेल्फीचा नाद बेतला जीवावर! तीन मैत्रिणींचा बुडून मृत्यू, एकीला वाचविण्यात यश

धबधब्यावर पाय घसरल्याने घडली दुर्दैवी घटना; आंध्र प्रदेशातील अल्लुरी जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार. व्हिडिओ व्हायरल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
सेल्फीचा नाद बेतला जीवावर! तीन मैत्रिणींचा बुडून मृत्यू, एकीला वाचविण्यात यश

अल्लुरी: निसर्गाच्या सानिध्यात फिरताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात आला आहे. मुल्लुंगुम्मी धबधब्यावर सेल्फी घेण्याच्या नादात पाय घसरून पडल्याने तीन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. हुकुंपेटा मंडलातील जांबुवलसा गावातील चार मैत्रिणी या वनक्षेत्रात सहलीसाठी गेल्या होत्या, मात्र या आनंदाच्या सहलीचा अंत अत्यंत भीषण झाला. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तरुणाईच्या अनावश्यक धाडसावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, त्रिशा (१७), रत्नकुमारी (१६) आणि पवित्रा (१६) या आपल्या एका मैत्रिणीसह धबधब्याचा आनंद घेण्यासाठी गेल्या होत्या. धबधब्याखालील निसरड्या खडकावर उभे राहून सेल्फी काढत असताना त्यांचा अचानक पाय घसरला आणि त्या खोल पाण्यात पडल्या. एकाही मुलीला पोहता येत नसल्यामुळे त्या पाण्याच्या प्रवाहात खेचल्या गेल्या. मुलींच्या किंकाळ्या ऐकून जवळच असलेल्या स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी एका मुलीला वाचवण्यात यश मिळवले असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, उर्वरित तिघींचा पाण्याचा अंदाज न आल्याने आणि प्रवाहाचा वेग जास्त असल्याने बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य राबवले आणि तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. प्राथमिक तपासानुसार, हा धबधबा जरी लहान दिसत असला, तरी तेथील खडक अत्यंत गुळगुळीत आणि धोकादायक आहेत. पाण्याचा प्रवाह फसवा असून तो क्षणात बदलतो, ज्यामुळे पर्यटकांना परिस्थितीचा अंदाज येत नाही. पोलिसांनी पर्यटकांना आवाहन केले आहे की, अशा धोकादायक ठिकाणी केवळ फोटो आणि व्हिडिओसाठी जीव धोक्यात घालू नका.

काही दिवसांपूर्वीच याच जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठावर फोटो काढताना पाच विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या पाठोपाठ घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून, पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सुट्ट्यांचा आनंद घेताना केलेली ही लहानशी चूक तीन कुटुंबांना आयुष्यभराचे दुःख देऊन गेली आहे.

हेही वाचा