अकडलेले पेन्शन मिळवण्यासाठी महिलेने ९० वर्षीय सासूला खांद्यावर घेऊन केली पायपीट

छत्तीसगडमधील घटना

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
just now
अकडलेले पेन्शन मिळवण्यासाठी महिलेने ९० वर्षीय सासूला खांद्यावर घेऊन केली पायपीट

छत्तीसगड : केवळ ५०० रुपयांची मासिक पेन्शन मिळवण्यासाठी एका ५० वर्षीय महिलेला आपल्या ९० वर्षांच्या आजारी सासूला खांद्यावर बसवून भरउन्हात ९ किलोमीटर पायी जावे लागल्याची घटना छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातून समोर आई आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मैनपाट तालुक्यातील जंगलपारा गावातील सुखमनिया नावाच्या महिलेने आपल्या ९० वर्षांच्या अंथरुणाला खिळलेल्या सासूला खांद्यावर घेतले आणि रणरणत्या उन्हात, तापलेल्या रस्त्यावरून पायपीट करत 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'ची शाखा गाठली. गेल्या चार महिन्यांपासून या वृद्धेची पेन्शन बंद होती. बँकेत 'केवायसी' प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे ही पेन्शन रोखण्यात आली होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अखेर सुखमनिया यांनी सासूला स्वतः पाठीवर वाहून बँकेत नेण्याचा धाडसी पण वेदनादायी निर्णय घेतला. एका वाटसरूने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मैनपाट जनपद पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी खुशबू शास्त्री यांनी सांगितले की, "जानेवारी महिन्यापर्यंत बँक मित्राद्वारे वृद्धेला घरपोच पेन्शन मिळत होती. परंतु, केवायसी अपूर्ण असल्याने गेल्या चार महिन्यांपासून पेन्शन थांबली होती. आता बँकेत ही प्रक्रिया पूर्ण करून प्रलंबित असलेले २,००० रुपये तात्काळ देण्यात आले आहेत. तसेच पुढील महिन्यापासून पुन्हा घरपोच पेन्शन सुरू केली जाईल." डिजिटल इंडियाच्या काळातही गरिबांना मूलभूत हक्कांसाठी करावी लागणारी ही पायपीट सरकारी व्यवस्थेच्या संवेदनशून्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

हेही वाचा