ईशान्य दिल्लीतील फर्निचर मार्केटला भीषण आग; लाखोंचे नुकसान

मोजकीच दुकाने शिल्लक : व्यापारी; आग विझवण्यासाठी २६ बंब

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
ईशान्य दिल्लीतील फर्निचर मार्केटला भीषण आग; लाखोंचे नुकसान

नवी दिल्ली : ईद-उल-अजहाच्या तोंडावर ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये शुक्रवारी उशीरा रात्री भीषण आग लागून अनेक दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यू सीलमपूर मेट्रो स्थानकाजवळील फर्निचर मार्केटमध्ये रात्री उशीरा अचानक आग भडकली. लाकडी फर्निचर, प्लायवूड आणि अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले. घटनास्थळी अनेक दुकानांच्या रांगा राख झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री ११.५७ वाजता आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. परिस्थिती गंभीर होत गेल्याने तब्बल २५ ते २६ अग्निशमन बंब तैनात करण्यात आले. संपूर्ण रात्रभर आग विझविण्याचे काम सुरू होते.

अग्न‌िशमन दल उशीरा पोहोचल्याचा आरोप

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल उशीरा पोहोचल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, आग सुमारे ११.१५ वाजता लागली; मात्र अग्निशमन दल जवळपास तासाभराने घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. काही संतप्त नागरिकांनी अग्निशमन दलाच्या वाहनांवर दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागली.

“सणासुदीच्या काळात आमचे सर्वस्व जळून गेले. संपूर्ण मार्केट उद्ध्वस्त झाले असून; मोजकीच दुकाने शिल्लक राहिली आहेत,” अशी व्यथा एका स्थानिक व्यापाऱ्याने व्यक्त केली.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा