१० मागण्यांच्या चार्टरला पाठिंबा देण्याचे आवाहन करणार

पणजीः ‘आणखी सोसणे शक्य नाही’ (इनफ इज इनफ) चळवली खाली गोवा घटक राज्य दिनानिमित्त पणजी आझाद मैदानावर महासभा घडवून आणणार आहोत. गोवाभरातून लोकांनी एकत्र येऊन या सभेत गोव्यासाठी झुंजण्याचे आपले सामर्थ्य दाखवावे. या बैठकीत आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना बोलावून आमच्या १० मागण्यांच्या चार्टरला पाठिंबा देण्याचे आवाहन करणार, अशी माहिती न्या. फेर्दिन रिबेलो यांनी दिली.
आम्ही ३० मे रोजी गोवा घटक राज्य दिनी आझाद मैदानावर एकत्र होणार आणि या सभेत दोन विषय मांडणार. आम्ही एक विधेयक सर्व राजकीय पक्षाना दिले होते. त्यानंतर हे विधेयक सर्व विरोधी पक्षानी सभागृहात मांडले होते. पण फोंडा निवडणुकीमुळे विधानसभा तहकूब झाली. हे अधिवेशन लवकर बोलवावे आणि या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी या सभेत होणार आहे, अशी माहिती रिबेलो यांनी दिली.
दुसरा विषय २०२२-२३ मध्ये गोवा सरकारने आणलेल्या तीन कायद्यांचा असणार. त्यात कलम ३९ अ रद्द करणे, कलम १७ (२) आणि १७ (अ) मध्ये सुधारणा करणे तसेच गोवा जमीन महसूल कायद्यात बदल करून शेत जमिनींची राखण करण्याचा कायदा चालीस लावण्याची मागणी करणार, असे रिबेलो यांनी सांगितले.
आम्ही बैठकीत सांगितले आहे की, हा प्रांत कोकणी लोकांचा. आम्ही कुठलीही भाषा बोलू दे, मराठी, कोकणी किंवा इंग्रजी पण शेवटी आम्ही कोंकणी लोक. गाव हे कोंकणी लोकांचेच रहायला हवेत आणि आमच्याच गावात आम्ही बाहेरील व्हायला तयार नाहीत, असे मत रिबेलो यांनी व्यक्त केले. देशाच्या प्रत्येक प्रांतात भारतातील लोक प्रादेशीक ओळख सांभाळतात. त्याचप्रमाणे गोमंतकीयांनी आपली प्रादेशीक ओळख सांभाळायला हवी. गोमंतकीयांनी पूर्वी खूप त्याग केला आहे. त्रिस्ताव कुन्हा यांनी मुक्तीचा लढा सुरू करून गोव्याला भारताचा भाग बनवले. जॅक सिक्वेरा यांनी ओपीनीयन पोलच्या माध्यमातून गोव्याला अस्मिता दिली. आणि कोंकणी चळवळीच्या वेळी भाषा आणि प्रांत सांभाळला. आता आम्ही भविष्यात गोवा बदलायला देणार नाहीत, असा इशारा रिबेलो यांनी दिला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचारावर आवाज काढावा : रिबेलो
स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर भाजप आणि अभाविपने तक्रारी दाखल केल्या आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या घरातून बाहेर पडून डिचोली पोलीस स्थानकात गेले होते. जर तुम्हाला गोव्यावर प्रेम असेल तर भ्रष्टाचाराविरोधात झुंज द्या, असे कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो. कॅसिनो हे नदीतून बाहेर जायला हवेत असा कायदा आहे. ते अजून मांडवीत कशाला असा प्रश्न कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना विचारायला हवा, असा सल्ला रिबेलो यांनी दिला.
रिबेलो यांचे विश्वजीत राणे यांना आव्हान
विनापरवानगी बांधकामे करणाऱ्या स्वत:च्या कार्यकर्त्यांवर नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे कसलीच कारवाई न करता आमच्या सदस्यांना लक्ष करत सुटले आहेत. जे त्रास राणे यांनी कारापूर आणि केरीच्या लोकांना दिले आहेत; त्याच्या विरोधात घटनात्मक पद्धतीने कायदेशीर प्रक्रियेमार्फत आम्ही राणे यांच्या विरोधात लढा देणार, असा इशारा न्या. फेर्दिन रिबेलो यांनी दिला.