कृषी खात्याच्या अधिकाऱ्याची माहिती : काही प्रमाणात ‘मानकुराद’ आंबे उपलब्ध

पणजी : यावर्षी अवकाळी पाऊस पडल्यामुळे ‘मानकुराद’चा हंगाम संपला आहे. सध्या पावसात पिकणाऱ्या आंब्यांचा हंगाम आता सुरू झाला असून हा हंगामसुद्धा चांगला जाईल. तरीही सध्या बाजारात ‘मानकुराद’ आंबे उपलब्ध आहेत, अशी माहिती कृषी खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
यावर्षीचा हंगाम आंब्याच्या पिकासाठी सुवर्णकाळ घेऊन आला आहे. यंदा उत्पादन चांगले झाल्यामुळे ‘मानकुराद’ आंब्याला चांगला दर मिळाला. हवामानाचा फटका यंदा आंब्याला बसला नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हंगाम चांगला असल्यामुळे आंब्याचे पीकही भरपूर आले आहे. बाजारात भरपूर प्रमाणात ‘मानकुराद’ आंबा दाखल झाला आहे. उत्पादन वाढल्यामुळे आंब्याचे दर बरेच घसरले आहेत. उत्पादन जास्त झाल्यामुळे आणि आवक कमी झाल्यामुळे कमी दरात आंबे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आंबे कुजण्याच्या भीतीने स्वस्तात विक्री
हंगामाच्या सुरुवातीलाच ‘मानकुराद’ आंब्याचा दर ६ हजार रुपये प्रति डझन इतका होता. पण पीक आल्यानंतर बाजारात अचानक आंब्याची मोठी आवक झाली आणि दोन महिन्यांच्या आत ‘मानकुराद’चे दर ३०० रुपये डझन इतके खाली आले. आंब्याचा एवढा मोठा साठा तयार झाला होता की, आंबे कुजण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी ते स्वस्त दरात विकून टाकले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
‘मुसराद’, ‘नीलम’, ‘रत्ना’चा हंगाम सुरू
आता हापूस आणि ‘मानकुराद’ या आंब्यांचा हंगाम संपला आहे. काही प्रमाणात हे आंबे अजूनही बाजारात उपलब्ध आहेत. हे दोन्ही आंबे उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होतात. आता सध्या ‘मुसराद’, ‘नीलम’ आणि ‘रत्ना’ या आंब्यांच्या जातींचा हंगाम सुरू झाला आहे. हे आंबे पाऊस सुरू झाल्यावर पिकतात. तसेच काही भागांत ‘रायवळ’ आंबे (घोटा) देखील उपलब्ध आहेत.