
वास्को : केसरव्हाळ-वेर्णा येथे तिसऱ्या मजल्यावरून खाली पाहत असलेल्या रणजीत छबीनाथ (३६) याचा तोल जाऊन जमिनीवर पडल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसरव्हाळ येथे एका चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी मूळचा उत्तरप्रदेशचा परंतु सध्या हेडलँड-सडा येथे राहणारा रणजीत हा मजूर म्हणून काम करीत होता. रणजीत तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळून मृत पावल्यासंबंधी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या अपघात विभागाकडून वेर्णा पोलिसांना गुरुवारी सायंकाळी कळविण्यात आले. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तेथील इतर मजुरांकडे चौकशी सुरू केली. रणजीत गुरुवारी काम करीत असताना सकाळी साडेअकराच्या दरम्यान कुठेतरी गेला होता. त्यानंतर पावणे बाराच्या दरम्यान तो परतला. तो दारुच्या नशेत असल्याने त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर तो तिसऱ्या मजल्यावर गेला. तेथून तो खाली वाकून पाहत असताना त्याचा तोल गेल्याने जमिनीवर आपटला. गंभीर जखमी झाल्याने त्याला त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रिस्ली कार्व्हालो अधिक तपास करीत आहेत.