बीएमडब्ल्यू कार चालकाला प्रतिबंधात्मक अटक

सहा महिने पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याची हमी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
just now
बीएमडब्ल्यू कार चालकाला प्रतिबंधात्मक अटक

पणजी : दोनापावला येथील रस्त्यावर मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून तीन वाहनांना धडक देण्यात आली होती. त्यातील नुकसान झालेल्या कार मालकांनी तक्रार दिली नव्हती. तर, बीएमडब्ल्यू कार चालकाला प्रतिबंधात्मक अटक करून उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हजर करण्यात आले.

दोनापावला येथील रस्त्यावर मंगळवार १९ रोजी रात्री उशिरा मद्यधुंद अवस्थेत जगदीश सरदेसाई (वय २७, रा. दोनापावला) याने बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून महिंद्रा ईव्ही, स्कोडा रॅपिड आणि महिंद्रा थार या तीन वाहनांना धडक दिली होती. त्यात तिन्ही गाडींचे नुकसान झाले होते. त्यातील एकाही मालकाने तक्रार दिली नाही. त्यामुळे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबू मदनवर यांनी कार चालक सरदेसाई याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याच दरम्यान कार चालकाने दारूच्या नशेत अपघात झाल्यानंतर पोलिसांना तसेच इतरांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे पणजी पोलिसांनी त्याला प्रतिबंधकात्मक अटक केली. त्यानुसार, बुधवार २० रोजी त्याला तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी सफल शेट्ये याच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी कार चालक जगदीश सरदेसाई याच्याकडून ७५ हजार रुपयांचे बाँन्ड घेण्यात आले. तसेच पुढील सहा महिने दर सोमवारी सकाळी १० वाजता पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याची हमी घेण्यात आली.