पत्रादेवी-पेडणे येथील घटना : कंटेनरचालकाला लांजा-रत्नागिरी येथे अटक

कोरगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पत्रादेवी येथे गुरुवारी सकाळी अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नारायण सहदेव सावळ (वय ६४) यांचा भरधाव कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नारायण सावळ हे दररोजप्रमाणे सकाळी चालण्यासाठी पत्रादेवी महामार्ग परिसरात गेले होते. यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ मोपा पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच मोपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील प्रक्रिया सुरू केली. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मोपा पोलीस करीत आहेत.
नारायण सावळ यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्रादेवी परिसरातही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे. महामार्गावरील वाढते अपघात आणि भरधाव वाहनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कंटेनरने त्यांना जोरदार धडक देऊन पळ काढला. यानंतर मोपा पोलीस स्थानकाचे निरीक्षक निनाद देऊलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सहाय्याने कंटेनर चालकाला लांजा (महाराष्ट्र) येथे जाऊन अटक केली. अटक केल्यावर कंटेनर चालकाला गोव्यात आणण्यात आले.