मनोज परब यांनी राजकारण न सोडण्याचा गोमंतकीयांचा सल्ला

‘चर्चेची वार्ता’मध्ये प्रतिक्रियांचा पाऊस : पक्षांतर्गत धुसफुशीवर लोकांची टीका

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
21 mins ago
मनोज परब यांनी राजकारण न सोडण्याचा गोमंतकीयांचा सल्ला

पणजी : मनोज परब यांनी राजकारण सोडले. आरजीपी पक्षाची उभारणी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी पक्ष आणि राजकारण सोडले. ‘गोंयकार’ म्हणून तुम्हाला काय वाटते? असा सवाल दै. गोवन वार्ताच्या फेसबुक पेजवर विचारण्यात आला होता. त्यावर वाचकांनी, परब यांना गोव्याच्या भविष्यासाठी आवश्यक असलेला 'क्रांतिकारी नेता' संबोधत त्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे, तर काहींनी त्यांच्या स्वभावातील आक्रमकता अाजच्या स्थितीसाठी जबाबदार धरली आहे. या सर्व घडामोडींवर वाचकांनी व्यक्त केलेल्या काही निवडक प्रतिक्रिया....

मनोज परब यांची भाषा गोमंतकीय राजकारणाला पूरक नव्हती. त्यांच्याकडे ‘भायले आणि भितुल्ले-निज गोयकार’ या पलीकडे मुद्देच नव्हते. राज ठाकरे सारखा आक्रमकपणा होता. पण त्यांच्यासारखी गर्दी जमवता आली नाही. - शेखर पणशीकर
...........
मनोज परब यांनी राजकारण सोडू नये. ते एक क्रांतिकारी नेते आहेत आणि गोव्याच्या जनतेसाठी त्यांची खूप गरज आहे. गोव्याच्या भविष्यासाठी त्यांचा आवाज आणि कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. - गौरीश गावस

...................


आपल्या अहंकारामुळे स्वतःच्या पायावर स्वतः कु-हाड मारून घेतली. - अमेश गावकर
...................
ते एक प्रामाणिक राजकारणी आहेत आणि गोव्याच्या तसेच गोवेकरांच्या भविष्याबद्दल त्यांना खरी काळजी आहे. मला खात्री आहे की, काही वर्षांनी गोव्यातील राजकीय सत्ता आणि नियंत्रण गमावल्यानंतर गोव्यातील जनतेला त्यांचा नक्कीच पश्चाताप होईल. - गिरिधर केळुसकर

...................
मनोज परब हे एक खरे नेते आहेत. त्यांचा दृष्टिकोन आणि स्वाभिमान आपल्याला प्रत्येक लढाईत विजय मिळवून देतो. - अनिश गावकर

...................


मनोज परब हेच खरे नेते आहेत. मनोज यांच्यामुळेच प्रत्येक गोवेकर 'आरजी' पक्षाशी जोडला गेला. त्यांच्या निर्भीड भाषणांनी आणि आक्रमक पवित्र्याने अनेक तरुणांना आकर्षित केले. त्यांच्याशिवाय ‘आरजीपी’ची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. - अमित नाईक

.......................


हा पक्ष म्हणजे केवळ 'वन मॅन शो' आहे. इथे एकाधिकारशाही चालते. फक्त मोजक्याच कार्यकर्त्यांना किंमत दिली जाते. अनेक जण पक्ष सोडून गेले, पण त्यांची मनधरणी करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही; कारण मनोज यांच्यापेक्षा हुशार लोक इथे चालत नाहीत. वैयक्तिक अहंकारामुळे हा पक्ष संपणार, ही जी भीती होती ती अखेर खरी ठरली. शिवाय परब यांचा स्वभाव घमेंडी आहे. वीरेश पुढे येतोय याचा त्यांच्यावर दबाव होताच. स्वतःला पक्षापासून वेगळे केले, हे एकच काम त्यांनी चांगले केले. - मधुसूदन बोरकर
..........
‍गोव्यात 'आरजी'चा दबदबा निर्माण करणारा मनोज परब हा खरोखरच एक उत्कृष्ट नेता म्हणून ओळखला जात होता. - चरणजित सप्रे

...................
मनोज नसतील तर 'आरजीपी' शून्य आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांचा विश्वासघात केला, त्यांना त्यांची लायकी कळेल. आज माझ्यासोबत जे घडले, ते उद्या तुमच्यासोबतही घडू शकते. - समीर नाईक
.................
मुख्य पक्षनेते मनोज परब यांनीच बाजूला झाल्यामुळे आता हा पक्ष बंद झाला पाहिजे. पक्षातील बहुतांश लोक अंतर्गत पातळीवर आहेत. बरेच लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी भाजपमध्ये गेले, पण भाजप काही फुकट नोकऱ्या देत नाही. - मुकेश आसवेकर

.................
चांगला निर्णय आहे. आता थिवी मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करा. भविष्यासाठी शुभेच्छा! - नवनाथ सावंत

.................
समाजकारणात आणि राजकारणात राग व भावना आवरता आल्या पाहिजेत, त्या नियंत्रणात असल्या पाहिजेत. रागाच्या आणि भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन पश्चाताप करायला भाग पाडतो. कोणत्याही प्रसंगी डोके थंड, जिभेवर साखर आणि मन शांत ठेवून जो निर्णय घेतो, त्याचा निर्णय सहसा चुकत नाही. - वल्लभ बोंद्रे

................
राजकारणात भरपूर पैसा कमावला, आता नंतर ते असे विधान करतील की, 'गोव्याच्या विकासासाठी आणि गोमंतकीय जनतेच्या लढ्यासाठी मी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे.' हे सर्व नाटक आहे. - दीपक देसाई
................
या वादाला मनोजसोबत वीरेशची राजकीय अपरिपक्वताही तितकीच जबाबदार आहे. मनोजच्या स्वभावावर टीका होत असली, तरी गोव्याच्या हितासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याबद्दल शंका घेता येणार नाही. वीरेशने सामंजस्य दाखवून गैरसमज दूर करणे गरजेचे होते. वैयक्तिक अहंकारामुळे दोन जिवलग मित्र राजकारणाचे बळी ठरले, विश्वास संपला आणि जनतेच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या. शेवटी हे गोव्याचे दुर्दैव! - बबन नागवेकर
.....................
गोव्याच्या राजकारणाला एक नवी दिशा देणाऱ्या या तरुण नेत्याच्या अचानक एक्झिटमुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते सध्या मोठ्या चिंतेत आहेत. या निर्णयावर येत्या काही दिवसांत पक्षाकडून अधिकृतपणे काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. - नीलेश नाईक
.........................


मानले मनोज तुला! तुझे राजकीय विचार मला कधीच पटले नाहीत आणि पटणारही नाहीत. मात्र, ज्या पक्षाला तू जन्म दिलास, वाढवलास आणि तो पक्ष मोठा झाल्यावर काही कारणास्तव तू त्याचा त्याग केलास, हे धाडस दुसरे कोणीच करू शकत नाही. - मिलिंद अणवेकर

................
महाराष्ट्रात राज ठाकरेंचे जसे झाले, तसेच इथे झाले. लोकांना कायम एकच मुद्दा चालत नाही. -  महेश गावडे
....................
‍तो राज ठाकरेंची कॉपी करायला गेला, म्हणून त्याचा पुरता फज्जा उडाला. - आलेलुया फर्नांडिस

...................
घाईगडबडीत, नाराज होऊन एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. - आनंद ताम्हणकर

हेही वाचा