
पणजी : गोव्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून, रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे (आरजीपी) ( Revolutionary Goans Party) अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य मनोज परब यांनी राजकारणाला रामराम करण्याची घोषणा केली आहे. आरजीपीच्या अध्यक्षपदासह संस्थापक सदस्य म्हणूनही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पणजी येथील आरजीपीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील घोषणा केली. मनोज परब (Manoj Parab) यांच्या या निर्णयामुळे गोव्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरजीपीच्या स्थापनेपासून पक्ष संघटना उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी त्यांच्या घोषणेमुळे पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर आरजीपीची पुढील रणनीती काय असेल आणि पक्षात कोणते बदल घडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज परब अध्यक्ष म्हणून हवेत : अजय खोलकर
दरम्यान, मनोज परब यांचा राजीनामा अजून पक्षाकडे आलेला नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयाविषयी आम्ही बैठकीत चर्चा करणार. आम्हाला मनोज हे अध्यक्ष म्हणून हवे आहेत. आज संध्याकाळीपर्यंत पक्ष आपला निर्णय कळीत करणार असल्याचे आरजीपीचे खजिनदार अजय खोलकर यांनी सांगितले.