गेल्या तीन वर्षांत गोव्यात ७० आंतरजातीय विवाह : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

म्हणाले-गोव्यातील एसटी आरक्षणासाठी दिल्लीत विशेष पाठपुरावा करणार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th May, 06:11 pm
गेल्या तीन वर्षांत गोव्यात ७० आंतरजातीय विवाह : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पणजी : गोव्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पर्वरी येथील सचिवालयात समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गोव्यात सुरू असलेल्या विविध केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या तीन वर्षांत गोव्यात ७० आंतरजातीय विवाह झाल्याची माहिती दिली. यामध्ये २०२४ मध्ये १०, २०२५ मध्ये ३७ आणि २०२६ मध्ये २३ जोडप्यांची नोंद झाली असून, अशा जोडप्यांना सरकारकडून अडीच लाख रुपयांचे प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या यशाचा पाढा वाचताना सांगितले की, २०१४ पूर्वी अनेक नागरिकांची बँक खाती नव्हती; मात्र जनधन योजनेमुळे गोव्यात २.३२ लाख नवीन खाती उघडली गेली. याशिवाय, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून ४.१५ लाख लाभार्थ्यांनी व्यावसायिक कर्ज घेतले असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यात २ हजार मोफत गॅस जोडण्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेचा २९ हजार गोवेकरांनी लाभ घेतला असून, उजाला योजनेद्वारे तब्बल २.६२ कोटी एलईडी बल्बचे वाटप राज्यात झाले आहे.
राज्यातील दिव्यांग आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी त्रुटींवर प्रकाश टाकला. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात ३३ हजार दिव्यांग असून त्यांना मासिक पेन्शन मिळत असली, तरी त्यांच्यासाठी राज्यात एकही विशेष सरकारी शाळा नाही. राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज शाळा उभारण्यास नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, राज्यातील एसटी समुदायाच्या १६.६ टक्के लोकसंख्येला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा