शवविच्छेदन अहवालात झाले स्पष्ट

म्हापसा : बार्देश तालुक्यातील नास्नोळा येथे काल राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आलेल्या १७ वर्षीय तिया परब या तरुणीचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळेच झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. काल या तरुणीचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये आढळून आला होता.
काल तिया घरात कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना आणि वैद्यकीय यंत्रणेला पाचारण केले होते. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास केला आणि सुरुवातीला या प्रकरणाची 'संशयास्पद मृत्यू' (Unnatural Death) म्हणून नोंद केली होती. मृत्यूचे नेमके कारण समोर यावे, यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. आज प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाने तियाचा मृत्यू नैसर्गिक असल्यावर शिक्कामोर्तब केले असले, तरी पुढील विश्लेषणासाठी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे. म्हापसा पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.