कारचे मोठे नुकसान, चालक सुखरूप

फोंडा: बेतोडा-बोरी बायपास रस्त्यावर एका रानटी गव्याने कारला जोरदार धडक दिली. यात कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या अपघातातून कार चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही आणि तो सुखरूप बचावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार बेतोडा-बोरी बायपासवरून जात असताना अचानक एक गवा रस्त्यावर आला आणि त्याने कारला थेट धडक दिली. या धडकेत कारचे बोनेट आणि इंजिनचा भाग पूर्णपणे दाबला गेला. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चालकाला मदत केली आणि त्याला सुरक्षितपणे गाडीबाहेर काढले. या धडकेत गवा जखमी झाला असण्याची शक्यता लक्षात घेता, वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात शोधमोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) सुरू केली आहे.
रस्त्यावरील अंधारामुळे अपघातांचे सत्र
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, या बायपास रस्त्यावर रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार असतो. स्ट्रीट लाईट्स किंवा पुरेशा प्रकाशाअभावी रात्रीच्या वेळी समोरून येणारे वन्यप्राणी वाहनचालकांना वेळेत दिसत नाहीत. या भागात अनेकदा रानटी गवे अचानक मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनचालकांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे आणि रस्त्यावरील अंधाराची समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.