आज गोव्यातील फार्मसी दुकाने राहणार बंद

रुग्णालयांतील औषध दुकाने राहणार सुरू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
आज गोव्यातील फार्मसी दुकाने राहणार बंद

पणजी : अवैध पद्धतीने सुरू असलेल्या ऑनलाईन औषध विक्रीच्या (online sale of Medicines) विरोधात बुधवार, २० मे रोजी गोव्यासह देशभरातील सर्व फार्मसी (Pharmacy) दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अखिल भारतीय ड्रॅगिस्ट संघटनेच्या आवाहनानंतर गोवा केमिस्ट आणि ड्रॅगिस्ट संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

बंदमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांच्या साखळी दुकानांचाही समावेश आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व रुग्णालयांतील फार्मसी दुकाने सुरूच राहतील, असे गोवा केमिस्ट आणि ड्रॅगिस्ट संघटनेतर्फे सांगण्यात आले.

सध्या देशभरात ‘जीएसआर ८१७’ आणि ‘२२०’ या नियमांनुसार ऑनलाईन पद्धतीने औषध विक्री करण्यात येत आहे. ‘जीएसआर ८१७’ या नियमाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसून त्याच्या मसुद्याबाबत केवळ सूचना मागवण्यात आल्या आहेत. असे असतानाही ऑनलाईन औषध विक्री करणारे प्लॅटफॉर्म या नियमाचा गैरवापर करत आहेत. तसेच, ‘जीएसआर २२०’ हा नियम कोविड काळात घरपोच औषधे देण्यासाठी सुरू करण्यात आला होता आणि कोविडनंतर तो बंद करणे आवश्यक होते, मात्र अद्याप तसे झालेले नाही, अशी माहिती गोवा संघटनेने दिली.

केंद्रीय संघटनेचे देशभरात १२.४० लाख सदस्य असून त्यांच्यावर सुमारे ४० लाख लोकांचे पोट अवलंबून आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे फार्मसी दुकानांना फटका बसत असून यावर अवलंबून असणाऱ्या लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हे दोन्ही नियम रद्द करण्याची मागणी केंद्रीय संघटनेने केली आहे.

संपाच्या दिवशी सर्व रुग्णालयांतील फार्मसी दुकाने सुरू राहणार आहेत. तरीदेखील आपत्कालीन परिस्थितीमुळे औषधांची कोणतीही तातडीची गरज उद्भवल्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा