पणजी महापालिकेकडून १०७.१७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी महापालिकेकडून १०७.१७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

पणजी : पणजी महापालिकेने (Corporation of the city of Panjim)  मंगळवारी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीच्या १०७.१७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. चालू आर्थिक वर्षात महापालिकेला कर व अन्य उत्पन्नातून ११३.१९ कोटी महसूल मिळण्याची अपेक्षा असून; ११३.०३ कोटी रुपये महसूली खर्च होणार आहे. तर ३७.०३ कोटी भांडवली उत्पन्न व ५०.० कोटी भांडवली खर्च होण्याची अपेक्षा आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पीय निधीतून पणजीतील विविध विकास कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल; अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिली. बैठकीनंतर महापौरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील काही वर्षांप्रमाणे यंदाही आम्ही शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. आमच्यावर कितीही आरोप झाले तरीही महानगरपालिका कधीही तोट्यात गेलेली नाही.

आमच्या आधी दरवर्षी घरपट्टी पाच ते दहा टक्क्यांनी वाढवण्यात आली होती. यंदाही आम्हाला घरपट्टी वाढवण्याचा पर्याय देणार आला होता. मात्र आम्ही तो नाकारला आहे. प्रशासन योग्य पद्धतीने कर गोळा करत नाही. मात्र याचा बोजा आम्ही सामान्य पणजीकरांवर टाकणे चुकीचे असल्याने; आम्ही घरपट्टी न वाढवण्याचा निर्णय घेतला.  

ते म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात पणजीतील विकास कामांसाठी साधारपणे २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यानुसार आम्ही पणजी मध्ये ऑटिझम असणाऱ्या मुलांसाठी विशेष केंद्र उभारण्याचा विचार करत आहोत.

असे करणारी पणजी ही देशातील पहिली महानगरपालिका ठरेल. मासळी बाजाराचे काम योग्य पद्धतीने झालेले नाही. हे काम पुन्हा नव्याने करावे लागणार आहे. याशिवाय भाजीपाला बाजारात विविध कामे करण्यात येतील. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात आवश्यक असणारा निधी सरकारकडून उपलब्ध करून देणे हे माझे काम आहे. 

स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्याचे काम

शहरात सध्या काही ठिकाणी सांडपाणी वाहिनी, ड्रेन दुरुस्तीची कामे सुरू आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत १८ जून रस्त्याचे काम करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव नंतर ते वगळण्यात आले. आता पुन्हा या रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव देण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीने याआधी एकाच वेळी सर्व रस्ते बंद केल्याने शहरात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे १८ जून रस्त्याचे काम करण्यापूर्वी त्याचा आराखडा आम्हाला देण्याची मागणी आम्ही स्मार्ट सिटीकडे केली आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरा 

रोहित मोन्सेरात यांनी सांगितले की, गृहखात्याच्या आदेशानुसार केवळ पीआय आणि पीएसआय वाहतूक उल्लंघना बाबत चलन देऊ शकतात. पणजी पोलीस स्थानक आणि वाहतूक विभागात सध्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा भरण्याची मागणी आम्ही गृहखात्याला केली आहे. पणजीत पोलीस अधिकाऱ्यांची संख्या वाढल्यास वाहतूक प्रश्न सुटू शकेल.


हेही वाचा