निवडणुका कधीही घ्या, गोव्यात सरकार काँग्रेसचेच!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना विश्वास

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
निवडणुका कधीही घ्या, गोव्यात सरकार काँग्रेसचेच!

मडगाव : दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्यातील चार ते पाच मतदारसंघ वगळता काँग्रेस (Indian National Congress) मजबूत स्थितीत आहे, हे मागील निवडणुकांवरून दिसून आले आहे. भाजप (BJP) निवडणुकांना सामोरे जाण्यास घाबरत असून निवडणुका (Goa Assembly Election) कधीही झाल्या, तरी आगामी सरकार काँग्रेसच स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर (Amit Patkar) यांनी व्यक्त केला.

मडगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटकर यांनी सांगितले की, दक्षिण गोव्यासह उत्तर गोव्यातही काँग्रेस संघटन मजबूत आहे. या आधीच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता, उत्तर गोव्यातील पाच मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघात काँग्रेसने चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे यापुढील सरकार काँग्रेसच स्थापन करेल हे निश्चित आहे. भाजप निवडणुकांना घाबरत आहे. कारण फोंडा पोटनिवडणुकीत भाजप हरणार असे दिसू लागताच आपल्याच माणसांना न्यायालयात याचिका दाखल करायला लावून निवडणूक आयोगाच्या सहकार्याने फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्यात आली. यातून जनता आपल्या सोबत नाही, हे भाजपला दिसून आलेले आहे. त्यामुळेच ते निवडणुकांना घाबरत आहेत. पालिका निवडणुकांच्या बाबतीतही असेच असून त्यामुळेच राज्य सरकार पालिका निवडणुका घेण्याचे टाळून प्रशासकांची नियुक्ती करून काम चालवत आहे. निवडणुका डिसेंबरमध्ये होऊ देत किंवा फेब्रुवारीत, जनतेने भाजपला नकार देण्याचे ठरविलेले आहे.

गोवा फॉरवर्ड (Goa Forward) व काँग्रेस यांच्यात निवडणूक पूर्व युती आहे. या आधीच्या जिल्हा पंचायत निवडणुकाही काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांनी एकत्रच लढविल्या होत्या. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस गोवा फॉरवर्डविरोधात भाजप अशीच थेट लढत होईल. इतर कोणतेही पक्ष प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन काम करताना दिसत नाही. गोवा फॉरवर्डसोबत युती असून त्यांच्याशी समन्वय साधून चर्चेतून पुढे जात आहोत, असे पाटकर म्हणाले. या आधीच्या निवडणुकांत पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली होती. यापुढील निवडणुकांतही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नेतृत्वाची संधी दिली जाईल, असेही पाटकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा