घटनास्थळावर चार मजूर काम करत होते, तिघांनी वेळीच पळ काढल्याने वाचला जीव.

पणजी : गोव्यात काल रात्री पडलेल्या जोरदार पावसानंतर वास्को येथील सडा-हार्बर रस्त्यावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान अचानक दरड कोसळल्याने एका परप्रांतीय मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य मजूर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, क्रूझ सेंटर आणि पर्यटन क्षेत्राला जोडण्यासाठी सडा-हर्बर रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डोंगर कापून रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. काल रात्री गोव्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी असलेली माती मऊ झाली होती. आज सकाळी जेव्हा या भिंतीचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते, तेव्हा अचानक वरून मातीचा ढिगारा मजुरांवर कोसळला.
एकाचा दुर्दैवी अंत
दरड कोसळली तेव्हा घटनास्थळावर एकूण चार मजूर काम करत होते. माती कोसळताना पाहून इतर तीन मजुरांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, दुर्दैवाने मनोरंजन बिंद नावाचा मजूर या मातीच्या ढिगाऱ्याखाली पूर्णपणे गाडला गेला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वास्को अग्निशामक दल (Fire Station) आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य राबवून मातीच्या ढिगाऱ्याखालून मनोरंजन बिंद यांचा मृतदेह बाहेर काढला. तसेच, ढिगाऱ्यातून सुटका केलेल्या अन्य दोन मजुरांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक गुरुदास कदम, स्थानिक आमदार संकल्प आमोणकर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एज्ना क्लिटस यांनी दरडग्रस्त भागाची पाहणी केली. इतर अधिकाऱ्यांसोबत केलेल्या संयुक्त पाहणीत कंत्राटदाराला आधीच चेतावणी दिली होती, असे आमोणकरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

बातमी अपडेट होत आहे.