सोशल मिडियावर बनावट खाते उघडून फसवणुकीसाठी वापर

पणजी : गोव्यातील दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या (Freedom Fighter of Goa) नावांचा वापर करून ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अज्ञात व्यक्ती सोशल मीडियासह विविध डिजिटल माध्यमांतून स्वातंत्र्यसैनिकांची नावे आणि ओळख वापरत नागरिकांची दिशाभूल करत असल्याची माहिती मिळाली आहे.
गोवा मुक्ती लढ्यात योगदान दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचा वापर ऑनलाईन फसवणुकीसाठी (Online Fraud) केला जात असल्याचे दिसून आले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. पुरुषोत्तम काकोडकर यांच्या नावे इंस्टाग्रामवर प्रोफाईल बनविण्यात आला आहे. त्याखाली स्व. मोहन रानडे, डॉ. ज्युलीयाव मिनेझिस, विश्वनाथ लवंदे तसेच इतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची नावे आहेत. ‘नोंदणीकृत स्वातंत्र्यसैनिक’, ‘अजून अंगोलात’, ‘वकिलांची गरज आहे’, इंग्रजी भाषेतून अशी काही वाक्ये या प्रोफाईलमध्ये आहेत.
गोवा मुक्तीलढ्यात योगदान दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या नावे सोशल मिडियावरील हे बनावट खाते पाहून सध्या संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींच्या नावांचा अशा गैरप्रकारांसाठी वापर होणे अत्यंत दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.
दरम्यान, नागरिकांनी अशा संदेशांवर किंवा ऑनलाईन लिंकवर विश्वास ठेवू नये, कोणतीही वैयक्तिक माहिती अथवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खातरजमा करावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. सायबर गुन्हे शाखेकडून (Cyber cell, Goa) या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.