'युडीएफ'चे ऐतिहासिक पुनरागमन

तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहा वेळा आमदार राहिलेले व्ही. डी. सतीशन यांनी आज केरळचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यासोबतच राज्यात गेल्या १० वर्षांपासून असलेल्या डाव्या लोकशाही आघाडीची (LDF) सत्ता संपुष्टात आली असून, काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीचे (UDF) ऐतिहासिक पुनरागमन झाले आहे. तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियमवर झालेल्या एका भव्य सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सतीशन आणि त्यांच्या २० सदस्यीय मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. लोकशाही परंपरेचे दर्शन घडवत मावळते मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनीही मंचावर उपस्थित राहून सतीशन यांचे अभिनंदन केले. नुकत्याच झालेल्या १४० सदस्यांच्या विधानसभा निवडणुकीत 'युडीएफ'ने १०२ जागा जिंकून दणदणीत बहुमत मिळवले आहे.

मंत्रिमंडळात 'पिढीबदल' आणि १४ नवे चेहरे नवीन मंत्रिमंडळात १४ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, यात एकूण २१ मंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसकडून रमेश चेन्निथला, सनी जोसेफ, के. मुरलीधरन यांच्यासह ११ जणांनी, तर प्रमुख मित्रपक्ष 'आययूएमएल'कडून (IUML) पी. के. कुन्हालीकुट्टी यांच्यासह ५ मंत्र्यांनी शपथ घेतली. याशिवाय केरळ काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनाही स्थान देण्यात आले आहे. सतीशन यांच्याकडे वित्त आणि बंदर, तर चेन्निथला यांच्याकडे गृहखाते राहण्याची शक्यता आहे. या नव्या सरकारकडून केरळच्या जनतेला मोठ्या विकासाच्या अपेक्षा आहेत.