नॅशनल टेस्टिंग एजन्सीशी थेट संबंध असल्यामुळे केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णीला मिळाला गोपनीय पेपरचा एक्सेस.

पुणे/दिल्ली : देशातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच 'नीट-युजी २०२६' (NEET-UG) चा पेपर लीक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक करण्यात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) मोठे यश आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अंतर्गत परीक्षा प्रक्रियेत थेट सहभाग असलेल्या आणि मुळ लातूर येथील निवृत्त केमिस्ट्री लेक्चरर पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि त्यांच्या पालकांची वर्षानुवर्षांची मेहनत पैशांच्या हव्यासापोटी कशी विकली जाते, याचे धक्कादायक वास्तव या अटकेमुळे समोर आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, हा कोणताही संघटित सिंडिकेटचा भाग नसून अत्यंत पद्धतशीरपणे केलेला 'सेलेक्टिव्ह लीक' प्रकार असल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मूळचा लातूरचा असलेला आणि पुणे येथील एका नामांकित कॉलेजमधून चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेला पी. व्ही. कुलकर्णी हा या संपूर्ण गैरव्यवहाराच्या केंद्रस्थानी आहे. निवृत्त झाल्यानंतरही तो 'एनटीए'च्या परीक्षा प्रक्रियेत आणि पेपर सेट करणाऱ्या गोपनीय टीममध्ये सक्रिय होता. याच पदाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने परीक्षेपूर्वीच केमिस्ट्री विषयाचा पेपर लीक केला. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णीने तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल कॉपी किंवा प्रिंटेड पेपर वाटण्याची चूक केली नाही; कारण तसे केल्यास पकडले जाण्याची भीती होती. याऐवजी त्याने कमालीची गुप्तता पाळत आपल्या पुणे येथील राहत्या घरी 'स्पेशल कोचिंग क्लास' आयोजित केला होता.

या काळ्या कारभारात त्याला मनीषा वाघमारे नावाच्या दुसऱ्या संशयिताची मोठी मदत लाभली. तिला सीबीआयने १४ मे रोजीच अटक केली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मनीषाने देशभरातून नामांकित आणि श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी गोळा केले. कुलकर्णीने या विद्यार्थ्यांना आपल्या घरात एकत्र करून नीट परीक्षेतील केमिस्ट्रीचे प्रश्न, त्यांचे बहुपर्यायी पर्याय आणि अगदी अचूक उत्तरे स्वतः तोंडाने बोलून विद्यार्थ्यांच्या वह्यांमध्ये लिहून घेतली. विद्यार्थ्यांनी हे सर्व प्रश्न हस्तलिखित स्वरूपात आपल्या नोटबुकमध्ये नोंदवले होते. ३ मे रोजी जेव्हा देशभरात प्रत्यक्ष परीक्षा झाली, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या वह्यांमधील नोट्स आणि मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळल्याचे सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. या सीक्रेट क्लासेससाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आली होती.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीनंतर सीबीआयने १२ मे रोजी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला होता. यापूर्वी ७ मे रोजी राजस्थानमध्ये हा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आला होता. गुन्हा दाखल होताच सीबीआयने देशभरात विशेष पथके तयार करून छापेमारी सुरू केली. आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण ७ ते ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील पाच जणांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून उर्वरित आरोपींना ट्रँझिट रिमांडवर दिल्लीत आणले जात आहे.
२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या या खेळामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आधी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा २१ जून रोजी पुन्हा घेतली जाईल. परीक्षा घेणाऱ्या मुख्य संस्थेतीलच जबाबदार व्यक्ती अशा प्रकारे भ्रष्टाचारात लिप्त आढळल्याने संपूर्ण देशाच्या परीक्षा पद्धतीवर आणि गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआय सध्या या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची (Money Trail) कसून चौकशी करत असून यात आणखी मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
